मुंबई : कतारहून आलेल्या विमानात एका प्रवाशाने दारूच्या नशेत गोंधळ घालून विमान तात्काळ उतरवण्यास भाग पाडल्याचा प्रकार शनिवारी घडला. याप्रकरणी सहार पोलिसांनी आरोपी प्रवाशाला अटक केली आहे.

विमानातून प्रवास करताना दारूच्या नशेत प्रवासी अनेकवेळा विमान कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतात. असाच प्रकार शनिवारी मुंबई विमानतळावर घडला. कतारहून येणारा प्रवासी मोहम्मद सरफुद्दीन अब्दुल कादर उल्वर याने दारूच्या नशेत विमानात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तो विमान कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत होता. त्याला विरोध करणाऱ्या सहप्रवाशांसोबतही त्याने भांडण केले. इतर प्रवाशांवरही त्याने आरडाओरड केली.

यावेळी जागेवरून उठलेल्या या प्रवाशाला विमान कर्मचारी बसण्यासाठी सांगत असताना त्याने महिला कर्मचाऱ्यांशीही गैरवर्तन केले. प्रवाशाचा हा गोंधळ पाहून विमानात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर विमानाच्या वैमानिकाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्याही सूचना या प्रवाशाने ऐकल्या नाहीत. त्यामुळे आणीबाणीच्या स्थितीत वैमानिकाला विमान उतरवावे लागले. विमानतळावर विमान उतरल्यानंतर सरफुद्दीनविरोधात सहार पोलिसांकडे विमान कर्मचाऱ्याकडून तक्रार करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली.