मुंबई : इराण – इस्राएल, अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये महाराष्ट्रातील अनेक विदयार्थी, पर्यटक आणि प्रवासी अडकले होते. तेथे अडकलेल्या नागरिकांना घेऊन विशेष विमाने मुंबईत दाखल होत आहेत. रविवारी रात्री अबुधाबीहून पहिले विमान मुंबईत ३८८ प्रवाशांना सुरक्षित घेऊन आले. त्यानंतर मंगळवारी दिवसभरात पाच विमाने मुंबई विमानतळावर उतरली. बुधवारी ४ मार्च रोजी चार विशेष विमाने मुंबईत दाखल होणार आहेत. राज्यात सुरक्षित परतल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मुंबई विमानतळावर मंगळवारी इमिरटस इके ५०६ (दुबई ते मुंबई) हे विमान दुपारी १.५५ वाजता आले. त्यानंतर स्टार एअरची दोन विमाने संध्याकाळी ७.३० आणि रात्री ९ वाजता दुपारी फुजैरा विमानतळावरून मुंबईत आली. या दोन्ही विमानांमधून एकूण १६४ प्रवासी मुंबई विमानतळावर दाखल झाले. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे ८४ विद्यार्थी, तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागातील इतर नागरिकांचा समावेश होता. याशिवाय इंडिगोची दोन विमाने जोद्दाहवरून मुंबईत दाखल झाली.

कोल्हापूरचे प्रवासी मायदेशी परतले

दुबईला पर्यटनासाठी गेलेले २९ प्रवासी मंगळवारी कोल्हापुरात दाखल झाले. आपल्या हॉटेलजवळच बॉम्बस्फोट झाल्याचे या पर्यटकांनी सांगितले. तसेच दुबई विमानतळावर येत असताना वाटेत बॉम्बस्फोट झाल्याचा आवाज ऐकल्याचेही त्यांनी सांगितले. मायदेशी सुखरुप परतल्याबद्दल या पर्यटकांनी आनंद व्यक्त केला.

आज चार विशेष विमाने

बुधवारी रॉयल जॉर्डनियन विमान कंपनी,गल्फ एअऱ आणि स्पाईस जेटची दोन विमाने फुजैराह आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मुंबईत दाखल होणार आहेत.