मुंबई : इराण-इस्त्रायल, अमेरिका संघर्ष तूर्तास थांबला असला तरी दुबई सरकारने येत्या ३१ मेपर्यंत आता दिवसाला केवळ एकाच भारतीय विमानालादुबई विमानतळावर उतरण्याची परवानगी दिली आहे. भारतीय तसेच अन्य देशांतील सर्वच विमान कंपन्यांसाठी हा नियम लागू केला आहे. मात्र, या निर्णयाचा मोठा आर्थिक फटका एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेट
या प्रमुख भारतीय विमान कंपन्यांना बसला आहे. तसेच दुबईच्या विमान तिकिटात भरमसाठ वाढ होण्याची शक्यता आहे. मध्यपूर्वेतील देशांत त्यातही दुबईत जाणाऱ्या भारतीय प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. प्रवाशांची मागणी जास्त असल्याने दुबईला भारतीय विमान कंपन्या मोठ्या प्रमाणावर विमान सेवा देतात. मात्र, आता दिवसाकाठी केवळ एकाच विमान कंपनीच्या एकाच विमानाला प्रवास करण्याचा नियम दुबईने लागू केल्यानंतर याचा फटका भारतीय कंपन्यांना बसणार आहे. हा नियम लागू झाल्यानंतर भारतीय विमान कंपन्यांची शिखर संख्या असलेल्या द फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने या निर्णय़ाविरोधात केंद्र सरकारशी संपर्क साधला आहे.
दुबईने एकाच विमानाला परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर केंद्र सरकारने दुबई प्रशासनावर निर्बंध उठवण्यासाठी दबाव आणण्याचे आवाहन केले आहे. जर निर्बंध कायम राहिले, तर दुबईस्थित विमान कंपन्या एमिरेट्स आणि फ्लायदुबई यांच्या विरोधात प्रतिशोधात्मक उपाययोजना करण्याचा विचार करावा, असे एफआयएने भारत सरकारला सूचित केले आहे. २० एप्रिल ते ३१ मे या उन्हाळी हंगामात दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणिअल मक्तूल आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमान कंपन्यांना दररोज फक्त एकाच फेरीची परवानगी असेल, असे दुबई एअरपोर्ट्सने २७ मार्च रोजी एका खाजगी ई-मेलद्वारे विमान कंपन्यांना कळवले आहे.
दुबईसाठी सर्वाधिक विमाने
एप्रिल आणि मे महिन्यात भारतीय विमान कंपन्यांची इतर कोणत्याही देशाच्या विमान कंपन्यांपेक्षा दुबईकरिता सर्वाधिक उड्डाणे नियोजित असतात. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस उन्हाळी सुट्टीत दुबईकरिता ७५० हून अधिक उड्डाणे, तर इंडिगोने ४८१ आणि स्पाईसजेटची ६१ उड्डाणे नियोजित आहेत. भारताने २०२५ मध्ये दुबईसाठी सर्वाधिक विमान वाहतूक केल्याने ११.९ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला होता.
निर्बंधामुळे विमान संख्या घटणार
दररोज एकाच उड्डाणाच्या मर्यादेमुळे प्रत्येक परदेशी विमान कंपनीला दरमहा केवळ ३० किंवा ३१ उड्डाणे करण्याची परवानगी मिळते. याउलट एमिरेट्स आणि फ्लायदुबई दररोज शेकडो उड्डाणे करतात.
आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचा आशिया-युरोपवर भर
लुफ्थान्सा, सिंगापूर एअरलाइन्स आणि ब्रिटिश एअरवेज यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी युद्धापूर्वी दुबईसाठी खूप कमी उड्डाणे नियोजित केली होती. तसेच ३१ मेपर्यंत दुबईसाठीच्या सर्व सेवा स्थगित केल्या आहेत. या विमान कंपन्यांनी आपली क्षमता थेट आशिया-युरोप मार्गांकडे वळवली आहे. येथे मागणीमुळे भाडे प्रचंड वाढले आहे.
