मुंबई : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही तलावांमध्ये पावसाचा मुक्काम कायम आहे. मात्र गेल्या २४ तासांमध्ये विहार आणि तुळशी तलावांच्या क्षेत्रात मुसळधार तर उर्वरित चार तलावांच्या क्षेत्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सातही तलावांमधील जलसाठ्यात तब्बल ३९ हजार ४३४ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. परिणामी, जलसाठा १६.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

अप्पर वैतरणा, मोडसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावातून मुंबईकरांना दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. जूनमध्ये पावसाने लपंडाव सुरू केल्यामुळे तलावांमधील जलसाठा खालावला होता. परिणामी, मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र अप्पर वैतरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाची रिमझिम, तर मोडकसागर, मध्य वैतरणा, भातसाच्या पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र विहार आणि तुळशी तलावांच्या पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. असे असले तरीही तलावांतील जलसाठ्याची स्थिती सुधारू लागली आहे. सुमारे १० टक्क्यांच्या खाली गेलेला जलसाठा बुधवारी पहाटे ६ च्या सुमारास १६.०८ टक्क्यांवर पोहोचला.

कोसळणाऱ्या पावसामुळे तलावांमध्ये सोमवारी सुमारे २० हजार ८५९ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली होती. तलावांच्या पाणलोटक्षेत्रात मंगळवारी पडलेल्या रिमझिम पावसामुळे १८ दशलक्ष ५७५ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडून एकूण जलसाठा २ लाख ३२ हजार ७४४ दशलक्ष लिटरवर पोहोचला. तलावांमधील जलसाठ्यात हळूहळू सुधारणा होत आहे. असाच पाऊस पडत राहिल्यास लवकरच पाणी कपात रद्द करण्याचा विचार प्रशासन पातळीवर होईल, असा विश्वास मुंबई महानगरपालिकेतील जल अभियंता खात्यामधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

तलावक्षेत्रात मंगळवारी झालेली पावसाची नोंद

तलाव — पाऊस
अप्पर वैतरणा – ६ मि.मी.
मोडसागर – ३५ मि.मी.
तानसा – ६८ मि.मी.
मध्य वैतरणा – २८ मि.मी.
भातसा – २९ मि.मी.
विहार – २१० मि.मी
तुळशी – ३१३ मि.मी

तलावांतील ६ जुलैपर्यंतचा एकूण जलसाठा

वर्ष — जलसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

२०२२ — २,३२,७४४
२०२१ — २,७०,९३७
२०२० — १,६०,६९१