मुंबई शहराची लाईफलाईन ओळखली जाणाऱ्या रेल्वेला आज पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला आहे. शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे मध्य रेल्वे-हार्बर रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. कल्याण-अंबरनथा-बदलापूर स्थानकांत रेल्वे ट्रॅकवर पावसाचं पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे. अनेक स्थानकांमध्ये रेल्वे ट्रॅकवर सुमारे २-३ इंच पाणी साचलेलं आहे. काही वेळापूर्वीच मध्य रेल्वेने ठाणे-कल्याण मार्गावरची अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक सुरु केली आहे.

आज रविवारचा दिवस असल्यामुळे लोकं मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडली नाहीयेत. मात्र सकाळी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना या पावसाचा फटका बसला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातही अनेक गाड्या थांबवल्या असून, गरज असल्यास घराबाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. याचसोबत हार्बर रेल्वेलाही पावसाचा फटका बसल्यामुळे, सीएसएमटी ते वाशी रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.याचसोबत लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या मध्य रेल्वेने रद्द केल्या आहेत.

मध्य रेल्वेसोबत पश्चिम रेल्वेलाही या पावसाचा फटका बसला आहे. वसई-विरार आणि नालासोपारा स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पावसाचं पाणी आल्या्मुळे या मार्गावरची सेवा बंद करण्यात आली आहे. या मार्गावरच्या सर्व लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून जलद मार्ग बंद केला असून. चर्चगेट ते बोरिवली मार्गावर सेवा सुरु असून १५-२० मिनीटं गाड्या उशीराने धावत आहेत.