एसटी महामंडळाने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी २७ ऑगस्टपासून मोठया प्रमाणात बसगाड्या सोडल्या आहेत. मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे यंदाचा एसटीचा प्रवास खडतर होण्याची चिन्हे आहेत. खराब रस्त्यांमुळे टायर पंक्चर होण्याची, तसेच बस बिघाडण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने दुरुस्ती पथकांना सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. यंदा आगार आणि दुरुस्ती पथकांसाठी नेहमीपेक्षा प्रत्येकी किमान दहा अतिरिक्त टायर ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : आरे वसाहतीमध्ये आंदोलन सुरूच

यंदा एसटी महामंडळाने गणेशोत्सवनिमित्त नियमित गाड्यांसोबतच २,५०० जादा गाड्या सोडल्या आहेत. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था झाली असून एसटीने जाणाऱ्या प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने खबरदारी म्हणून काही उपाययोजना केल्या आहेत. तशा सूचना आगार प्रमुख, विभाग नियंत्रक, चालक-वाहक, बस दुरुस्ती पथकांना दिल्या आहेत. पावसामुळे कोकणातील खराब रस्ते आणि टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटीसाठी कमी किलोमीटर धावलेले अथवा नवीन टायर वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील आगार, तसेच दुरुस्ती पथकांकडे नेहमीपेक्षा प्रत्येकी किमान दहा अतिरिक्त टायर ठेवण्यात यावेत आणि त्याचा वेळोवेळी आढावाही घेण्याची सूचना करण्यात आली आहे. जादा प्रवासी वाहतूक करताना अतिवृष्टीमुळे कशेडी घाटातून सुरक्षितरित्या एसटी चालवावी असेही चालकांना बजावण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टळावी आणि वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रायगड आणि रत्नागिरी विभागातील एसटीची गस्ती पथके २६ ते ३१ ऑगस्ट आणि ५ ते १० सप्टेंबर या काळात दोन्ही बाजूला २४ तास तैनात असणार आहेत. ट्रेलर, अन्य जड वाहने आणि वाळूचे ट्रक यांना गणेशोत्सव काळात वाहतूक करण्यास मनाई करण्याचे अध्यादेश काढण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागाशी संपर्कही साधण्यास सांगितले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात एसटी गाड्यांमध्ये होणारे बिघाड लक्षात घेऊन प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुर्ला-पनवेल पट्ट्यात कोकणभवन येथे, रामवाडी-कोलाडदरम्यान वाकणफाटा येथे, कोलाड-पोलादपूरमधील लोणेरेफाटा, पोलादपूर-चिपळूण दरम्यान कशेडी येथे, चिपळूण-राजापूर दरम्यान संगमेश्वर आणि राजापूर ते सावंतवाडी दरम्यान तरळा येथे दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत.

अन्यथा चालकांना निलंबित करणार

मार्ग तपासणी पथक, गस्ती पथकाना अल्कोहोल चाचणी करणारे यंत्र देण्यात येणार आहेत. तपासणीदरम्यान मद्यपान केल्याचे आढळताच चालकाला तात्काळ निलंबित करण्यात येणार आहे. तसेच मद्यपी चालक ज्या आगारतील असेल तेथील आगार व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा एसटी महामंडळाने दिला आहे.