कुलदीप घायवट
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ या देशव्यापी अभियानाच्या निमित्ताने ध्वजनिर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. मात्र, अचानक लाखोंच्या संख्येने राष्ट्रध्वजांसाठी मागणी आली असून कमी कालावधीत या मागणीची पूर्तता करणे अवघड बनले आहे. परिमामी, राष्ट्रध्वजांची निर्मिती करून त्याचा पुरवठा करण्याचे काम रद्द करण्याची वेळ व्यावसायिकांवर ओढवली आहे.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याताना प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा फडकवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जुलै रोजी ‘घरोघरी तिरंगा’ या मोहिमेची घोषणा केली. त्यानंतर, सर्व महानगरपालिका, सरकारी, निमसरकारी, प्रशासकीय व खासगी कार्यालये, पोलीस विभाग, बँका आदींकडून राष्ट्रध्वजासाठी मागणी वाढली. या मोहिमेची घोषणा होताच सातत्याने राष्ट्रध्वजांची संख्यांची, किमतीची विचारणा करण्यात येत होती. मात्र, जसजसा स्वातंत्र्यदिन जवळ येत आहे, तशी राष्ट्रध्वज खरेदीसाठी मागणी वाढत आहे. दिवस-रात्र मेहनत घेऊनही मोठ्या संख्येने राष्ट्रध्वजांनी निर्मिती करणे शक्य नसल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.

दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त पाच ते सहा हजार राष्ट्रध्वज बनवण्यात येतात. कोरोनामध्ये व्यवसाय ठप्प झाला होता. तर कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर हळूहळू व्यवसायात जम बसू लागला होता. मात्र, आता अचानकपणे मोठ्या प्रमाणावर राष्ट्रध्वजांची मागणी होऊ लागली. परंतु, राष्ट्रध्वजांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने सर्व मागणीची पूर्तता करणे अशक्य असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

राष्ट्रध्वज निर्मितीचे काम किमान चार महिने अगोदर करावे लागते. मात्र, १० ते १५ दिवसांत लाखोंच्या संख्येने राष्ट्रध्वज तयार करणे अवघड आहे. राष्ट्रध्वजासाठी लागणारे कापड सुरतहून आणण्यात येते. त्यानंतर योग्यरित्या कटाई, शिवणकाम, पद्धतशीरपणे बांधणी करून राष्ट्रध्वजाचा पुरवठा केला जातो. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी आलेल्या ५० हजार ते एक लाख राष्ट्रध्वजांच्या निर्मितीचे काम रद्द करावे लागले. तिन्ही पाळीत कामगारांनी कामे केली तरी इतक्या संख्येने राष्ट्रध्वज तयार करणे शक्य नाही, असे ध्वज व्यावसायिक ग्यान शहा यांनी सांगितले.

मुंबईहून रांचीला ध्वज पाठवले
मुंबई महानगरातील महानगरपालिका, सरकारी कार्यालये, खासगी कार्यालयाकडून या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रध्वजांसाठी मोठी मागणी आली आहे. त्याचबरोबर रांची, गुवाहाटी, केरळ येथेही मागणीनुसार ध्वज पाठविण्यात आले. ४८ बाय ७२ फुटांचा सर्वात मोठा ध्वज रांचीला पाठवण्यात आला, असे ग्यान शहा यांनी सांगितले.