गणेशोत्सवनिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या काही श्रेणींचे तिकीट काढताना सध्या क्षमस्व (रिग्रेट) असा संदेश मुंबईकरांना येत आहे. मात्र आता याच काळातील परतीच्या प्रवासाच्या आरक्षणाचीही अशीच अवस्था आहे. यंदा गौरी-गणपतींचे सहाव्या दिवशी विसर्जन होणार असून परतीच्या प्रवासाचे तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र परतीच्या प्रवासासाठी ६ आणि ७ सप्टेंबर रोजी स्लीपर श्रेणीच्या प्रतीक्षायादीचे तिकीटही उपलब्ध नाही. तर अन्य श्रेणींनाही मोठी प्रतीक्षायादी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनामुळे २०२० आणि त्यानंतर २०२१ मध्ये गणेशोत्सवनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या कमी होती. यंदा कोकणात जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे गृहीतच धरून मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत. मात्र कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांबरोबरच विशेष रेल्वे गाड्यांनाही प्रतीक्षायादी आहे. काही गाड्यांच्या श्रेणींच्या प्रतीक्षायादीचे तिकीट देणेही बंद करण्यात आले आहे. अशीच परिस्थिती परतीच्या प्रवासाची झाली असून बहुतांश मंडळींना एसटी, खासगी प्रवासी बस किंवा वैयक्तिक वाहनांमधूनच प्रवास करावा लागणार आहे.

तिकीट काढताना ‘क्षमस्व’ असाच संदेश येत आहे –

गणेशोत्सव ३१ ऑगस्टपासून सुरू होत असून पाच दिवसांच्या गणपतीचे ५ सप्टेंबरला विसर्जन होत आहे. या काळातील सावंतवाडी-दिवा गाडीचे प्रतीक्षायादीचे तिकीट देणेही बंद केले आहे. तिकीट काढताना ‘क्षमस्व’ असाच संदेश येत आहे. तर ७ सप्टेंबरला ३०० हून अधिक प्रतीक्षायादी आहे. कोकणकन्या एक्स्प्रेसमधील स्लीपर श्रेणीलाही सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग येथून मुंबईत येण्यासाठी या दोन दिवसांत प्रतीक्षायादीचेही तिकीट उपलब्ध नाही. मांडवी एक्स्प्रेसलाही ६ सप्टेंबरला स्लीपर श्रेणीला ‘क्षमस्व’ आणि ७ तारखेला ४०० प्रतीक्षायादी आहे. तर तुतारी एक्स्प्रेस, मडगांव-मुंबई सेन्ट्रल विशेष गाडी, कुडाळ-वसई विशेष गाडी, सीएसएमटीला येणारी जनशताब्दी एक्स्प्रेस, सावंतवाडी-दिवा (पनवेलपर्यंत), एलटीटीटीला येणारी डबल डेकर, सावंतवाडी-सीएसएमटी विशेष गाड्यांच्या ६ आणि ७ सप्टेंबरच्या परतीच्या स्लीपर श्रेणीसह विविध श्रेणीचे तिकीट हाऊसफुल्ल झाले आहे.

जातानाही गर्दी –

गणेशोत्सवानिमित्त २७ ते ३१ ऑगस्ट या काळात कोकणात मोठ्या संख्येने नागरिक जात आहेत. एलटीटी ते ठोकूर एक्स्प्रेस (सावंतवाडी, सिंधुदुर्गपर्यंत), कोकणकन्या एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-मडगांव विशेष यासह अन्य काही गाड्यांच्या स्लीपर श्रेणीच्या प्रतीक्षायादीचे तिकीटही देणे बंद करण्यात आले आहे.

एसटीही फुल्ल –

मुंबई महानगर आणि पुण्यातून कोकणात जाताना गट आरक्षणाच्या १,०९६ बस, तर वैयक्तीरित्या ७०६ बसगाड्यांचे आरक्षण झाले असून आणखी ७५५ गाड्यांचे आरक्षण सुरू आहे.तर कोकणातून येताना ७०८ गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During ganeshotsav the return train journey from konkan is also full house mumbai print news msr
First published on: 07-08-2022 at 12:48 IST