मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील येथील प्रस्तावित नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी शेतकऱ्यांवर राज्य शासनाची दडपशाही सुरु असून धमकावून त्यांच्याकडून जमिनी संपादन करण्याचा प्रकार सुरु असल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला.

या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे अशोक वालम यांना उद्धव ठाकरेंनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांना धमकावल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकल्पाविरोधात पुढाकार घेऊ नये असे त्यांना मातोश्रीवर सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. वालम आणि त्यांच्या पत्नीवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच माघार घेण्यासाठी पोलिसांनी त्यांचा छळ केल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून वालम सध्या मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगताना राणे यांनी वालम यांना दिलेले धमकीचे पत्रही पत्रकार परिषदेत सादर केले. नाणार परिसरातील १६ गावातील लोकांची या प्रकल्पाला संमती नाही. या ग्रामस्थांनी आम्हाला पॅकेज नको असे शासनाला सांगितल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रदुषणकारी प्रकल्पाद्वारे कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. आर्थिक फायद्यासाठीच शिवसेनेचा हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. निसर्गरम्य रत्नागिरीचे त्यामुळे नुकसान होणार असून प्रकल्पासाठी वापरली जाणारी रसायने, सांडपाण्यातून जमिनीत सोडली जाणारे घातक द्रव्ये यांमुळे येथील जमिनीचे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्प उभारणीसाठी येथील जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याच्या बागा तोडल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नारायण राणे म्हणाले, भाजपने हा प्रकल्प आणल्याचे शिवसेना सांगते. मात्र, राज्याचे आणि केंद्रातील उद्योग मंत्री हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे एका बाजूला विरोध दाखवायचा आणि दुसऱ्या बाजूला लोकांना प्रकल्पाच्या जमीनीसाठी धमकावलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे शिवसेनेचे आहेत. तसेच केंद्रातील अवजड व उद्योगमंत्री अनंत गिते हे देखील शिवसेनेचेच आहेत. या मंत्र्यांना सांगून उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प का रोखला नाही असा सवाल राणेंनी यावेळी केला.

दरम्यान, आठवड्याभरापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या प्रकल्पाला विरोध दर्शवत कोकणी माणसानेही याचा विरोध करावा असे आवाहन केले होते. तालुक्यातील सागवे येथे आयोजित प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी कोकणामध्ये अशा स्वरूपाचे कमालीचे प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याच्या शासनाच्या धोरणावर टीका करत मनसे या लढय़ामध्ये प्रकल्पग्रस्तांबरोबर अखेपर्यंत राहील, अशी हमी दिली होती. तसेच या संदर्भात मुख्यमंत्र्यांची ‘कानउघाडणी’ करण्याचे आश्वासन दिले होते.

कोकणी माणूस कोणत्याही प्रकल्पाला प्रथम विरोध करतो, पण पैशाचा लोभ, दबाव किंवा अन्य काही कारणांमुळे हळूहळू तो ढिला पडत जातो, या इतिहासाकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले होते आणि यावेळी तरी तसे होऊ न देण्याची विनंती केली होती.