मुंबई : संयुक्त अमिरातीमधून (युएई) प्रत्यार्पण करून आणलेला कुख्यात अमली पदार्थांचा सूत्रधार मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याने चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे. हिंदी सिनेसृष्टीतील (बॉलीवूड) प्रसिध्द कलावंत आणि राजकीय व्यक्तींना अमली पदार्थांचा पुरवठा आणि त्यांच्यासाठी मेजवान्या आयोजित केल्याची माहिती त्याने दिली. यामुळे अनेक दिग्गज कलावंत पोलिसांच्या रडावर आले आहेत.
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात तपास करीत असताना अमली पदार्थांचा सूत्रधार मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याचे नाव समोर आले. तो संयुक्त अरब अमिरातीत (युएई) राहून भारतात अमली पदार्थांचे व्यवहार करीत होता. नुकतेच त्याला प्रत्यार्पण करून भारतात आणले. हे संपूर्ण प्रकरण अडीचशे कोटी रुपयाचे आहे. त्याने भारताच्या विविध भागात अमली पदार्थांच्या निर्मिती आणि साठवणुकीचे अड्डे तयार केले होते.
सेलिब्रेटींसह आलिशान ‘ड्रग्ज’ मेजवानी
आरोपी मोहम्मद सुहेल शेख याने हिंदी सिनेसृष्टीतील (बॉलीवूड) अनेक दिग्गज कलाकार आणि राजकीय नेते यांच्यासाठी देशात आणि विदेशात अमली पदार्थांच्या मेजवान्या आयोजित केल्याचा खुलासा पोलिस चौकशीत केला आहे.
पोलिसांच्या चौकशीत अनेकांची नावे समोर आली. मुंबई, गोवा तसेच परेदशातील दुबई या ठिकाणी या अमली पदार्थांच्या मेजवान्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्याने दिली. त्यामुळे अमली पदार्थांचे जाळे हे सेलिब्रेटी आणि राजकारण्यांपर्यंत पोहोतल्याचे स्पष्ट झाले आहे. हे राजकारणी आणि सेलिब्रेटी पोलिसांच्या रडारवर आले असून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. सलीमने नाव घेतलेल्या सेलिब्रीटींसाठी आणखी कुणी पार्टी आयोजित केली होती का ? या व्यक्तींचे अन्य कुठल्या अमली पदार्थांच्या तस्करांशी संबंध आहेत का ? यापूर्वी आयोजित अमली पदार्थांच्या मेजवान्यांमध्ये सहभाग आहे का ? या मेजवान्या खर्चिक असल्याने त्यासाठीच्या पैशाचा स्रोत देखील तपासला जाणार आहे.
महिलेच्या अटकेनंतर लागला छडा
सुमारे अडीचशे कोटींच्या अमली पदार्थांचा व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संबध असल्याचे हे प्रकरण एका महिलेच्या अटकेपासून सुरू झाले होेते. मुंबई पोलिसांनी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी कुर्ला येथून परवीन बानो गुलाम शेख या महिलेला २५ कोटींच्या मेफेड्रॉन (एमडी) सह अटक केली होती. तपासामध्ये विक्रेत्यांपासून उत्पादकांपर्यंत मोठी साखळी उघडकीस आली. हे संपूर्ण प्रकरण अडीचशे कोटींच्या एमडीचे असल्याचे नंतर समोर आले.
याप्रकरणात पोलिसांनी जवळपास १५ जणांना अटक केली. परवीनला मिरा रोड येथील साजिद मोहम्मद आसिफ शेख हा अमली पदार्थ पुरवत होता. पोलिसांनी साजिदला अटक केली. साजिदच्या चौकशीत अमली पदार्थाच्या तस्करीतील मुख्य सूत्रधार सलीम शेख याचे नाव समोर आले होते. सलीम दुबईला राहून संपूर्ण भारतात अमली पदार्थांचे जाळे तयार केले होते.ही टोळी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मेफेड्रॉनचे उत्पादन आणि पुरवठा करत होते. त्यासाठी लागणारा कच्चा माल वेगवेगळ्या राज्यांतून आणला जात होता.
