मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगीची लढाई न्यायालयात जिंकल्यानंतर शिवसेनेला अखेर सोमवारी पालिकेने परवानगी दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार ही परवानगी देण्यात आली असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. २ ते ६ ऑक्टोबर अशा चार दिवसांसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिक आता दसरा मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत.

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अर्ज केले होते.  कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव दोन्ही गटांना पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे कारण देत पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा मुंबई महापालिकेचा निर्णय अयोग्य असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले होते.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाने शिवसेनेला अखेर परवानगी दिली. उपायुक्त रमाकांत बिरादार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून न्यायालयाच्या आदेशानुसार व नेहमीच्या अटींवर ही परवानगी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. वेळेची मर्यादा, आवाजाची पातळी अशा नेहमीच्या अटी घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

चार दिवसांची परवानगी

दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला दोन दिवसांची परवानगी पालिका देते. मात्र न्यायालयाने यावेळी चार दिवसांची परवानगी दिल्यामुळे पालिकेनेही शिवसेनेला २ ते ६ ऑक्टोबर अशी चार दिवसांची परवानगी दिली असल्याची माहिती विभागप्रमुख महेश सावंत यांनी दिली. पूर्व तयारीसाठी पुरेसा वेळ असून आम्ही परिसर सजवून भगवा करू, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली. शिवसेनेने २० हजार रुपये अनामत रक्कम व १४७५ रुपये भाडे भरून दसरा मेळाव्यासाठी मैदान आरक्षित केले आहे.