खरे आदिवासी पाडे दुर्लक्षितच..
माजी खासदार प्रिया दत्त यांनी पालघर जिल्हय़ातील सोनावे गावात रविवारी सौर ऊर्जा दिवे आणि विद्यार्थ्यांसाठी ई लर्निगचीे सुविधा उपलब्ध करून दिली. नर्गिस दत्त मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला; परंतु हे गाव प्रगत असून अतिदुर्गम भागाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले
पालघर हा आदिवासी जिल्हा असून त्यात अनेक आदिवासी गावे आणि पाडे आहेत. दुर्गम भागात वीज आणि रस्तेदेखील नाहीत. खासदारांतर्फे ही खेडी दत्तक घेऊन त्यांचा विकास केला जातो; परंतु अनेक खासदारांचा प्राथमिक सोयीसुविधा असलेल्या गावांकडेच कल होता. त्यात आता माजी खासदार प्रिया दत्त यांची भर पडलीे आहे. त्यांच्या नर्गिस दत्त मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सोनावे गाव दत्तक घेण्यात आले. रविवारच्या कार्यक्रमात सौर ऊर्जेचे दिवे, विद्यार्थ्यांना संगणक आणि विनामूल्य दिवे उपलब्ध करून देण्यात आले; परंतु या भागातील विद्यार्थी अनवाणी शाळेत येतात, त्यांच्या घरात वीज नसते, अशा विद्यार्थ्यांना त्याचा काय उपयोग होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी सायकल आणि चपलांचे वाटप करण्यात आले असले तरी त्याने कायमस्वरूपी प्रश्न सुटणार नाही, असेही ग्रामस्थांनी सांगितले. अनेक अतिदुर्गम पाडे असताना प्रगत असणाऱ्या सोनावे गावात येण्याचे प्रयोजन काय, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.