मुंबई : लोकल रेल्वेत प्रवास करताना आज सर्वजण कानाला इयर पॉड, इयर फोन्स लाऊन मोबाईलवरील मनोरंजन ऐकत आणि बघत असतात पण या श्रवण यंत्रांचा अतिवापर धोकादायक ठरू शकतो. अती वापर आणि अती आवाज तुम्हाला बहिरा करू शकतो. डॉक्टरांनी काय सल्ला दिला आहे ते पहा
सार्वजनिक ठिकाणी कुठेही बघा, आज दहा पैकी नऊजणांनी कानाला इअर फोन्स किंवा इअरपाॅड लावले असल्याचे दिसून येते. स्मार्टफोनच्या या युगात इअरफोन्स, इअरबड्स आणि इअर पॉड हे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलवर बोलण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी, ऑनलाइन बैठका, चित्रपट आणि सोशल मीडियासाठी लाखो लोक दररोज अनेक तास इअर पॉडचा वापर करत आहेत. अतिआवाजात या श्रवण यंत्रांच्या वापराने ऐकण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम होत आहे. तरुण वयातच बहिरेपणाचा येण्याची शक्यता अधिक असल्याचा इशारा कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
डाॅक्टरांच्या मते, सतत मोठ्या आवाजात आणि दीर्घकाळ इअर पॉड वापरल्यामुळे कानातील अतिसूक्ष्म पेशींवर ताण येतो. या पेशी एकदा खराब झाल्यानंतर पुन्हा तयार होत नाहीत. परिणामी सुरुवातीला कानात आवाज येणे, संभाषण नीट ऐकू न येणे, डोकेदुखी, चक्कर येणे आणि नंतर कायमस्वरूपी श्रवणशक्ती कमी होण्यास सुरुवात होते, असे तज्ञ डाॅक्टरांचे म्हणणे आहे.
तरुणांसह लाखो आबाळवृध्द दिवसातून ५ ते ८ तास इअर पॉड वापरत आहेत. कामाच्या ठिकाणी, प्रवासादरम्यान आणि घरीही कानात सतत इअरबड्स असल्याने कानांना विश्रांती मिळत नाही. रेल्वे, बस, विमानतळ किंवा गर्दीच्या ठिकाणी बाहेरील आवाज दाबण्यासाठी अनेकजण मोबाईलचा आवाज अधिक वाढवतात. ही सवय सर्वाधिक घातक ठरत आहे. कमी आवाजात ऐकल्यास बहिरेपणा येण्याची शक्यता कमी आहे पण हा आवाज जास्त झाला की बहिरेपणाची शक्यता अनेक पटीने वाढते.
तज्ञ डाॅक्टरांच्या मते ८५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज दीर्घकाळ ऐकल्यास श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. अनेक आधुनिक इअर पॉड १०० ते ११० डेसिबलपर्यंत आवाज निर्माण करू शकतात. त्यामुळे कानातील नसांवर आणि श्रवण यंत्रणेवर परिणाम होण्याचा धोका वाढतो. यामुळे अनेक ईएनटी (नाक, कान, घसा) डाॅक्टरांकडे कानाच्या समस्या घेऊन येणाऱ्या तरुणांची संख्या वाढू लागली आहे.
मुंबईतील ईएनटी डाॅक्टरांच्या मते गेल्या काही वर्षांत २० ते ४० वयोगटातील रुग्णांमध्ये श्रवणदोषाच्या तक्रारी वाढल्या आहेत. पूर्वी वृद्ध व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या समस्या आता तरुणांमध्ये दिसून येत आहेत. अनेक रुग्णांना कानात सतत शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणे (टिनिटस), आवाज अस्पष्ट ऐकू येणे आणि गर्दीत संभाषण समजण्यास अडचण निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. तज्ञ डाॅक्टरांनी इअर पॉड वापरणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. मोबाईलचा आवाज कमाल क्षमतेच्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त ठेवू नये. सलग एक तासापेक्षा जास्त वेळ इअर पॉड वापरू नयेत.दर तासाला किमान १० ते १५ मिनिटे कानांना विश्रांती द्यावी. झोपताना इअर पॉड वापरणे टाळावे. मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये वापरावर नियंत्रण ठेवावे. कानात आवाज येणे किंवा ऐकण्यात अडचण जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डिजिटल जीवनशैलीचा भाग बनलेल्या इअर पॉडचा वापर पूर्णपणे टाळणे शक्य नाही. त्याचा संयमित आणि सुरक्षित वापर करणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. अन्यथा आजची छोटीशी सवय भविष्यात कायमस्वरूपी बहिरेपणाचे कारण ठरू शकते, असा गंभीर इशारा डाॅक्टरांनी दिला आहे.
कोट
लोकांना हळू आवाजात ऐकण्याची सवय नाही. कानात लावण्यात आलेल्या इअर पाॅडने पण डाॅल्बी आवाज ऐकण्याची सवय लागली आहे. ती धोकादायक आहे. जास्त आवाजाने बहिरेपणा येऊ शकतो, कमी आवाजाने नाही. त्यासाठी इअर पाॅड वापरात बदल करण्याची आवश्यकता आहे. बोर्न कंडक्शन, कानाच्या वरील इअर पाॅड वापरल्यास हरकत नाही. कानाला सूज येणे, मळ साचणे अशा समस्या घेऊन तरुण येऊ लागल्या आहेत. इअर पाॅड, इअर फोन्सचा कमी वापर केला गेला पाहिजे. – डाॅ. अतुल वायकोळे, ईएनटी तज्ञ. मुंबई पालिका
