मुंबई : अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाचा एकूण निर्मिती खर्च आणि चित्रपटाने तिकीट खिडकीवर केलेली कमाई यावरून सुरू असलेले वादाचे मोहोळ अजूनही शमलेले नाही. हळूहळू का होईना गेल्या २५ दिवसांत‘ब्रम्हास्त्र’ने जगभरातून ४२५ कोटी रुपयांची कमाई केली असून चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंतीचा कौल दिल्याचे सिध्द केले आहे. या वर्षभरात जगभरातून सर्वाधिक कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट म्हणून ‘ब्रम्हास्त्र’ची नोंद झाली आहे.

‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या धर्तीवर ‘अस्त्रावर्स’ या संकल्पनेवर आधारित चित्रपट मालिका करण्याचा अयान मुखर्जीचा उद्देश आहे. ‘ब्रम्हास्त्र’ हा या मालिकेतील पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मिती खर्चाचे वेगवेगळे आकडे सांगण्यात आले आहेत. या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या धर्मा प्रॉडक्शनने हा खर्च ४०० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे म्हटले होते. तर अभिनेत्री कंगना राणावतने मात्र या चित्रपटासाठी जवळपास ६०० कोटी रुपये इतका निर्मिती खर्च झाला असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जगभरातून ४०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्या ‘ब्रम्हास्त्र’ला अजूनही हिट चित्रपट म्हणून मान्यता देण्यास ट्रेड विश्लेषकही तयार नाहीत. यावर ‘ब्रम्हास्त्र’च्या निर्मिती खर्चात पुढच्या चित्रपट मालिकेसाठी लागणाऱ्या व्हीएफएक्ससाठी केलेल्या गुंतवणुकीचाही समावेश आहे.

हेही वाचा : विश्लेषण : मुंबई पोलिसांचे शस्त्रपूजन व शस्त्रांचे बदलते स्वरूप…

त्यामुळे त्याच्या खर्चाबद्दल चाललेली चर्चा योग्य नसल्याचे अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर यांनी स्पष्ट केले आहे.जागतिक स्तरावर चित्रपटाने ४२५ कोटी रुपये कमाई केली असली, तरी देशभरातून केलेल्या कमाईच्या बाबतीत ‘ब्रम्हास्त्र’ अजूनही मागे आहे. ‘द काश्मीर फाईल्स’, ‘केजीएफ २’ आणि ‘आरआरआर’ या तीन चित्रपटांनी देशभरातून सर्वाधिक कमाईचे विक्रम केले आहेत. ‘ब्रम्हास्त्र’ अजून त्या आकडयांच्या जवळपासही नसल्याचे सांगण्यात येत आहे.