मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी तसेच हवामान बदलाबद्दल जागरूकता वाढावी यासाठी जागतिक पातळीवर ‘अर्थ अवर २०२६’ हा उपक्रम शनिवार, २८ मार्च रोजी रात्री ८:३० ते ९:३० या वेळेत साजरा केला जाणार आहे. भारतातही हा उपक्रम साजरा केला जातो. या उपक्रमासाठी ‘वर्ल्ड वाईल्ड लाईफ इंडिया’तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नावाची सदिच्छादूत म्हणून घोषणा करण्यात आली असून पर्यावरण रक्षणासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढाकार घेणार आहेत.
जागितिक पातळीवर ‘वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर’तर्फे दरवर्षी ‘अर्थ अवर’ हा उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षी या उपक्रमाचे २० वे वर्ष आहे. या उपक्रमात भारतासह एकूण १९० हून अधिक देश सहभागी होतात. यावेळी वर्ल्ड वाईल्ड लाईफ इंडियाने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या पी. व्ही. सिंधू, अमान अली बंगश आणि अयान अली बंगश, पंजाब किंग्ज, शांतनू मोईत्रा, विश्वनाथन आनंद, रिकी केज, दिया मिर्झा, सुदर्शन पटनायक, आध्यात्मिक गुरू डुक्पा थुक्से रिनपोछे, कुलसुम शादाब वहाब, सोहम देसाई आणि जॉय बरुआ आदी मान्यवरांची सदिच्छादूत म्हणून घोषणा केली आहे.
सदिच्छादूत पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणार आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणासाठीची जागतिक पातळीवरील चळवळ अधिक सक्रिय होण्यास मदत होणार आहे.
एक तास वीज का बंद केली जाते ?
‘अर्थ अवर’साठी एक तासाची वेळ ठरवून दिली जाते. या वेळेत जगभरातील नागरिक स्वेच्छेने एक तास अनावश्यक दिवे बंद करून या उपक्रमात सहभागी होत असतात. भारतातही अनेक राज्यातील नागरिक या उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान देतात.
हा उपक्रमात शनिवार, २८ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० ते ९:३० या वेळेत साजरा होणार आहे. या वेळेत १ तास अनावश्यक दिवे बंद करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. दिवे बंद करून उर्जेची बचत करण्यासोबतच नागरिकांनी निसर्गाशी अधिकाधिक जोडले जावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. तसेच हवामान आणि पर्यावरणीय संकटांचा सामना करण्यासाठी तातडीने कृतीची गरजही आयोजकांकडून अधोरेखित करण्यात आली आहे.
