मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी तसेच हवामान बदलाबद्दल जागरूकता वाढावी यासाठी जागतिक पातळीवर साजऱ्या करण्यात येणाऱ्या ‘अर्थ अवर २०२६’ या उपक्रमासाठी ‘वर्ल्ड वाईल्ड लाईफ इंडिया’तर्फे बुधवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नावाची सदिच्छादूत म्हणून घोषणा करण्यात आली. हा उपक्रम २८ मार्च रोजी रात्री ८:३० ते ९:३० या वेळेत साजरा केला जाणार आहे. ‘वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर’तर्फे दरवर्षी ‘अर्थ अवर’ हा उपक्रम राबविण्यात येतो.

यावर्षी या उपक्रमाचे २० वे वर्ष आहे. या उपक्रमात भारतासह एकूण १९० हून अधिक देश सहभागी होतात. यावेळी वर्ल्ड वाईल्ड लाईफ इंडियाने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या पी. व्ही. सिंधू, अमान अली बंगश आणि अयान अली बंगश, पंजाब किंग्ज, शांतनू मोईत्रा, विश्वनाथन आनंद, रिकी केज, दिया मिर्झा, सुदर्शन पटनायक, आध्यात्मिक गुरू डुक्पा थुक्से रिनपोछे, कुलसुम शादाब वहाब, सोहम देसाई आणि जॉय बरुआ आदी मान्यवरांची सदिच्छादूत म्हणून घोषणा केली. सदिच्छादूत पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणार आहेत.

‘अर्थ अवर २०२६’मध्ये सहभागी होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आपली जबाबदारी वाढली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी लाखो नागरिकांनी एकत्र येऊन कृती केली तर मोठा बदल घडू शकतो.’ असे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूने सांगितले.

२८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या या उपक्रमात सहभागी व्हावे, तसेच यावेळी ठरवून दिलेल्या वेळेत १ तास अनावश्यक दिवे बंद करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. दिवे बंद करून उर्जेची बचत करण्यासोबतच नागरिकांनी निसर्गाशी अधिकाधिक जोडले जावे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. तसेच हवामान आणि पर्यावरणीय संकटांचा सामना करण्यासाठी तातडीने कृतीची गरजही आयोजकांकडून अधोरेखित करण्यात आली आहे.