scorecardresearch

पूर्वमुक्त मार्ग जूनपासून रात्री बंद; मुंबई पारबंदर प्रकल्प कामासाठी जानेवारी २०२३ पर्यंत वाहतूक ब्लॉक

मुंबई पारबंदर प्रकल्पाअंतर्गत (शिवडी-नाव्हाशेवा सागरी मार्ग) बांधण्यात येणारा वरळी उन्नत रस्ता, तसेच आंतरबदल मार्गाच्या (इंटरचेंजेस) कामासाठी पूर्वमुक्त मार्ग जून २०२२ पासून जानेवारी २०२३ दरम्यान काही दिवस रात्रीच्या वेळी वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पाअंतर्गत (शिवडी-नाव्हाशेवा सागरी मार्ग) बांधण्यात येणारा वरळी उन्नत रस्ता, तसेच आंतरबदल मार्गाच्या (इंटरचेंजेस) कामासाठी पूर्वमुक्त मार्ग जून २०२२ पासून जानेवारी २०२३ दरम्यान काही दिवस रात्रीच्या वेळी वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतून रात्री चेंबूरच्या दिशेला जाणाऱ्या वाहनचालकांना द्राविडीप्राणायाम घडणार आहे.
मुंबई पारबंदर प्रकल्प सप्टेंबर २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यानुसार कामाला वेग देण्यात आला असून आतापर्यंत ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. एमएमआरडीएने आता या प्रकल्पाला जोडणाऱ्या आंतरबदल मार्गाबरोबरच शिवडी ते वरळी उन्नत रस्त्याच्या कामालाही वेग दिला आहे. या दोन्ही प्रकल्पांचे रॅम्प पूर्वमुक्त मार्गाला ओलांडून जाणार आहेत. त्यामुळे एकूणच पूर्वमुक्त मार्गावर काम करण्यासाठी एमएमआरडीएला वाहतूक ब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्यासाठी पूर्वमुक्त मार्ग काही काळासाठी वाहतुकीकरीता बंद ठेवावा लागणार आहे, अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. पूर्वमुक्त मार्ग वाहतुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करताना वाहतूक कोंडी होऊ नये, प्रवासी, वाहनचालकांची सुरक्षितता जपली जावी यासाठी रात्रीच्या वेळी वाहतूक ब्लॉक घेतले जाणार आहेत.
दिवसा वाहतूक नेहमीप्रमाणे
जून २०२२ पासून पूर्वमुक्त मार्ग रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान बंद ठेवण्यात येणार असल्याचे श्रीनिवास यांनी सांगितले. रॅम्पचे काम सात-आठ महिने चालणार आहे. त्यामुळे जून २०२२ पासून जानेवारी २०२३ पर्यंत पूर्वमुक्त मार्गावर रात्रीच्या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहेत. गरजेप्रमाणे वाहतूक
ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्वमुक्त मार्ग रात्रीच्या वेळी कायमस्वरूपी बंद राहणार नाही. जून २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान दिवसा या मार्गावर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असेल, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: East freeway closed night june transport block mumbai port project till january 2023 amy

ताज्या बातम्या