इस्थर अनुह्य़ा या सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीचे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपी चंद्रभान सानप याला सत्र न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरविले. बुधवारी शिक्षेची सुनावणी करण्यात येणार आहे.
सानपवर इस्थरचे अपहरण करणे, बलात्कार करणे, तिला मारहाण करणे, तिची हत्या करणे आणि नंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी भारतीय दंडविधानाच्या विविध कलमाबरोबरच भारतीय रेल्वे कायद्यानुसारही आरोप ठेवण्यात आले होते. स्थानिक पोलिसांना इस्थरच्या गुन्ह्याची उकल करण्यात अपयश आल्यानंतर प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी सानपचा छडा लावला होता.
‘टीसीएस’मध्ये नोकरी करण्याच्या उद्देशाने ५ जानेवारी रोजी इस्थर पहाटे पाचच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनसवर दाखल झाली होती. मात्र तेव्हापासूनच ती बेपत्ता होती. तिच्या आईवडिलांनी त्याबाबत तक्रार करूनही अधिकारक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करीत रेल्वे पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर १६ जानेवारी रोजी भांडुप येथे तिचा मृतदेह सापडला होता.
आरोपपत्रानुसार, स्थानकावर अनुह्या एकटीच बसल्याचे हेरून सानप तिच्याजवळ गेला आणि तिला घरी सोडण्याची तयारी दाखवली. त्यानंतर त्याने तिला मोटारसायकलवरून ओसाड जागी नेले. मात्र इस्थरने विरोध केल्यामुळे सानपने तिची गळा दाबून हत्या केली. त्याआधी त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचाही दावा पोलिसांनी केला होता.
