मुंबई : छेडा नगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्ण केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत पूर्व द्रुतगती महामार्गावर ५९ मीटर लांबीच्या आणि प्रत्येकी १६० मेट्रिक टन वजनाच्या दोन तुळया (गर्डर) यशस्वीपणे उभारण्यात आल्या. हे काम पूर्ण झाल्याने आता व्हायाडक्टच्या बांधकामाला वेग येणार आहे.

दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरे थेट जोडण्यासाठी १६.८ किमी लांबीचा पूर्व मुक्त मार्ग बांधण्यात आला. पी. डी’मेलो रोड ते चेंबूर दरम्यानचा पूर्व मुक्त मार्ग २०१३ पासून वाहतुकीसाठी खुला असून त्यामुळे प्रवास वेगवान झाला आहे. मात्र, पी. डी’मेलो रोडवरून वेगात चेंबूरला पोहोचल्यानंतर पुढे ठाण्याकडे जाण्यासाठी वाहनचालक आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन छेडा नगर ते ठाणे दरम्यान पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून आता या कामातील एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला आहे. १३.९ किमीच्या उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पाअंतर्गत ५९ मीटर लांबीच्या आणि प्रत्येकी १६० मेट्रिक टन वजनाच्या दोन तुळया यशस्वीरित्या उभारण्यात आल्या आहेत. अत्यंत वर्दळीच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर या तुळयांची उभारणी करण्यात आली. या कामासाठी साधारण १८ ते २४ तास कालावधी लागतो. मात्र, एमएमआरडीएने हे काम अवघ्या चार तासांत पूर्ण केले. या कामासाठी एमएमआरडीएला मुंबई वाहतूक पोलिसांची मदत मिळाली.

मुख्य दोन तुळयांची उभारणी पूर्ण झाल्याने आता सेगमेंट लाँचरद्वारे १,६३२ सेगमेंटची टप्प्याटप्प्याने उभारणी केली जाणार आहे. प्रत्येक सेगमेंटचे वजन सुमारे ९० मेट्रिक टन असून त्याद्वारे २५ मीटर रुंदीच्या सिंगल-सेल सेगमेंट सुपर स्ट्रक्चरची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे आता व्हायाडक्टच्या बांधकामाला वेग येणार आहे.

छेडा नगर – आनंद नगर पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण

छेडा नगर – आनंद नगर हा पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्प १३.९ किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे. हा सहापदरी उन्नत मार्ग आनंद नगरपासून सुरू होऊन पुढे मुलुंड, ऐरोली जंक्शन, जेव्हीएलआर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मानखुर्द आणि घाटकोपर मार्गे छेडा नगर येथे संपेल. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.