मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इबोलाच्या वाढत्या उद्रेकाला ‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केली आहे. त्यामुळे भारत सरकारने आफ्रिकेतील देशातून येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी), युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

मध्य आफ्रिकेतील काँगोमध्ये इबोलाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या साथीचा प्रभाव आता डीआरसीमधील तीन प्रांतांपर्यंत पोहोचला असून दक्षिण किवू येथे पहिला रुग्ण आढळला आहे. डीआरसीमधून आलेल्या प्रवाशांच्या मृत्यूनंतर शेजारील युगांडामध्येही दोन रुग्ण आढळले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. युगांडाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी इबोला विषाणूच्या बुंदीबुग्यो प्रकाराचे आणखी तीन नवीन रुग्ण आढळल्याचे जाहीर केले. इबोला विषाणूच्या बुंदीबुग्यो या प्रकारासाठी अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. मध्य आफ्रिकेच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ८६७ संशयित रुग्ण आणि २०४ मृत्यूंची नोंद झाली आहे.

मध्य आफ्रिकेतील बिघडत असलेली परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने विमानतळांवरील आरोग्य तपासणी आणि निगराणी अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सध्या या देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्या भारतीयांनी स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निवेदनाद्वारे दिल्या आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतात अद्याप बुंदीबुग्यो स्ट्रेनशी संबंधित इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

भारताने इबोला-प्रभावित देशांतून येणाऱ्या किंवा तेथून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी यापूर्वी २१ मे रोजी स्वतंत्र आरोग्य मार्गदर्शक तत्त्वे जारी केला होती. त्यात लक्षणे असलेल्या किंवा संसर्गाचा संशय असलेल्या प्रवाशांनी स्थलांतरापूर्वी विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता आफ्रिकेच्या तीन देशांमध्ये इबोलाचे रुग्ण सापडल्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

डब्ल्यूएचओचा जागतिक इशारा

स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे २३ मे २०२६ रोजी झालेल्या ७९ व्या जागतिक आरोग्य सभेत डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी इबोला आणि हंताव्हायरसच्या वाढत्या साथीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. सीमापार संक्रमणाचा धोका वाढत असल्याने जागतिक पातळीवर आरोग्य यंत्रणांनी अधिक सज्ज राहण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश

भारतात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नसला तरी आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. प्रभावित देशांतून परतणाऱ्या प्रवाशांनी २१ दिवस स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांनी नियमित तापमान तपासणे, ताप, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्त्रावाची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणे आणि डॉक्टरांना प्रवासाचा इतिहास सांगणे आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.