मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील जल वाहतुकीचे जाळे सक्षम करण्यासाठी मुंबई ते नवी मुंबईदरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात या जलमार्गावर पर्यावरणस्नेही वॉटर टॅक्सी धावणार आहेत. केंद्र सरकारने सौर ऊर्जा आणि विजेवरील बोटी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या मदतीने मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर साधारणत: वर्षभरानंतर मुंबई-नवी मुंबईदरम्यान पर्यावरणस्नेही वॉटर टॅक्सी धावण्याची शक्यता आहे.

देशातील पहिल्या ‘अतुल्य भारत समुद्र पर्यटन परिषद २०२२’चे नुकतेच मुंबईत अयोजन करण्यात आले होते. या परिषदेत पर्यावरणस्नेही बोटी सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई बंदर प्राधिकरणाचे (मुंबई पोर्ट अ‍ॅथॉरिटी) अध्यक्ष राजीव जलोटा यांनी दिली. या प्रकल्पाअंतर्गत मुंबई ते बेलापूर आणि मुंबई ते एलिफंटा या मार्गावर पर्यावरणस्नेही वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्राच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कोणत्या यंत्रणांच्या माध्यमातून करायची आणि त्यासाठी किती खर्च येईल याचा निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई ते बेलापूर आणि मुंबई ते एलिफंटा अशी वॉटर टॅक्सी सेवा फेब्रुवारीत सुरू झाली आहे. मात्र, ही सेवा महाग असल्याने वॉटर टॅक्सीला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर वॉटर टॅक्सीचे दर कमी करण्यात येणार असून यावरील अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही जलोटा यांनी या वेळी सांगितले.

जल वाहतूक मजबूत करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेऊन पर्यावरणस्नेही बोटी सेवेत दाखल करण्याची संकल्पना पुढे आली आहे. त्यानुसार सध्या मुंबई ते बेलापूर आणि मुंबई ते एलिफंटा मार्गावर धावणाऱ्या वॉटर टॅक्सीमध्येच प्रायोगिक तत्वावर सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच या बोटींचेच इलेक्ट्रिक बोटीत रूपांतर करण्यात येण्याचीही शक्यता आहे. मात्र सध्याच्याच बोटींमध्ये नवी यंत्रणा बसवायची की नव्या बोटी आणायच्या याचा निर्णय केंद्राकडूनच घेण्यात येणार आहे.

येत्या चार-पाच महिन्यांत प्रायोगिक तत्त्वावरील या प्रकल्पाचे स्वरूप स्पष्ट होईल. त्यानंतर प्रत्यक्षात प्रकल्प राबविण्यात येणार असून तो यशस्वी झाल्यानंतर पर्यावरणस्नेही वॉटर टॅक्सींचा वापर सुरू करण्यात येतील. यासाठी साधारण वर्षभराचा कालावधी लागणार असल्याचेही जलोटा यांनी सांगितले.