बिकट आर्थिक परिस्थितीमुळे राज्य सरकारने शासकीय खर्चात कपातीसह अनावश्यक दौरे, प्रधान सचिवांचा एक्झिक्युटिव्ह क्लासने विमान प्रवासासह अनेक र्निबध घातले असले तरी मुख्यमंत्री, मंत्री व आमदारांच्या विमान प्रवास, दौऱ्यांवर, शासकीय कार्यक्रम मात्र अर्निबधपणे सुरूच आहेत. र्निबधांचे आदेश काढले गेले, त्याच दिवशी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार नवी दिल्लीला विशेष शासकीय विमानाने गेले. केवळ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना काटकसरीचे धडे आणि राजकीय नेत्यांना मात्र सर्व मुभा असल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना महाराष्ट्रासारख्या मोठी अर्थव्यवस्था असलेल्या राज्याला निधी उभारणी सहज शक्य आहे, अशी भूमिका असताना विमान प्रवासासह किरकोळ र्निबधांमधून किती पैसे वाचणार, असा अधिकाऱ्यांचा सवाल आहे.
कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून सरकारने अनेक काटकसरीच्या उपाययोजना व र्निबध लागू केले आहेत. प्रधान सचिव व त्याहून वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना एक्झिक्युटिव्ह क्लासने प्रवासाची मुभा होती. आता ती स्थगित ठेवण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिवांनी स्वेच्छेने ही सवलत घेऊ नये, अशी अपेक्षा शासकीय आदेशात व्यक्त करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांचे दौरे, विमान प्रवास, कागदपत्रांची छायाप्रत, स्टेशनरी कमी वापरणे, आदींबाबत काटकसरीच्या उपाययोजनांवरून शासकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे दौरे मोठय़ा प्रमाणावर विमान प्रवासानेच होतात. अनेकदा विशेष विमान वापरले जाते, हेलिकॉप्टरचाही वापर होतो. भूमिपूजने, उद्घाटने आदींचे राजकीय लाभ पदरात पाडून घेण्यासाठी शासकीय खर्चाने समारंभ आयोजित करून मोठय़ा प्रमाणावर सरकारी तिजोरीतून उधळपट्टी होते. राजकीय नेत्यांना सर्व मुभा आहे आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मात्र र्निबध, यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे. मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांनी दौरे, समारंभ, विमान प्रवास टाळून आणि अत्यावश्यक असेल तेव्हा इकॉनॉमी क्लासने प्रवास करून आदर्श घालून द्यावा, असे मत काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३० जूनला काटकसरीचे आवाहन करून खर्चावर र्निबध, खर्चावर ३० टक्के कपात लागू केली. मात्र ते त्याच दिवशी राज्य सरकारच्या विशेष विमानाने नवी दिल्लीला गेले. वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या बैठकीसाठी व संसदेतील कार्यक्रमासाठी ते गेले होते. नवी दिल्लीसाठी सकाळी पाचपासून रात्री ११ पर्यंत विमानसेवा उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांना विशेष विमानासाठीचा चार-पाच लाख रुपये खर्च टाळता आला असता, दिल्लीसाठी १०-१२ हजार रुपयांमध्ये विमान प्रवासाचे तिकीट उपलब्ध झाले असते, असे काहींचे म्हणणे आहे. यासंदर्भात मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला असता वृक्षारोपण कार्यक्रमासाठी एक जूनला पहाटे पाच वाजेपर्यंत मुंबईत परतणे आवश्यक असल्याने मी विशेष विमान वापरल्याचे त्यांनी सांगितले. आमदारांना एक्झिक्युटिव्ह क्लासने प्रवास करता येत नाही आणि मुख्यमंत्र्यांसह मंत्री आवश्यक असेल तेव्हाच विमान प्रवास करतात आणि तोही इकॉनॉमी क्लासनेच करतात, असा दावा मुनगंटीवर यांनी केला.
विकासकामांवरील खर्चात कपात केल्याने आता उद्घाटने, भूमिपूजने आदी कार्यक्रम आपोआप कमी होतील, असा दावा उच्चपदस्थ सूत्रांनी केला.
मात्र वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीहून पहिल्या विमानाने पहाटे परतणे मुनगंटीवार यांना शक्य होते व त्या दृष्टीने कार्यक्रमाची वेळ निश्चित करता आली असती.
यापुढे राजकीय नेत्यांकडून विशेष सरकारी विमाने, शासकीय व खासगी हेलिकॉप्टरचा वापर कमी होणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
