शिवसेना नेते प्रताप सरनाईक पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनलायाच्या (ED) रडारवर आले आहेत. ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली असून ठाण्यातील जमीन आणि दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत ईडीने प्रताप सरनाईकांची ११.३५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अग्रलेख : प्रतापींचा प्रसाद!

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने NSEL प्रकरणात त्यांचे संचालक, प्रमुख अधिकारी, 25 डिफॉल्टर आणि इतरांवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला आहे. आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांना नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडच्या (NSEL) च्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केलं, बनावट कागदपत्रं तयार केली, खोटी खाती तायर केली आणि त्याद्वारे फसवणूक केल्याचा आरोप आहे. १३ हजार गुंतवणूकदरांची ५६०० कोटींची फसवणूक केल्याची माहिती ईडीने दिली आहे.

…तर मी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेन; प्रताप सरनाईक स्पष्टच बोलले

PMLA अंतर्गत करण्यात आलेल्या तपासात आढळून आलं आहे की, वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे NSEL च्या कर्जदार/ट्रेडिंग सदस्यांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, थकित कर्जाची परतफेड आणि इतर गोष्टींसाठी वळवले होते.

ईडीने केलेल्या तपासानुसार, आस्था ग्रुपकडे एनएसईएलची २४२.६६ कोटींची थकबाकी होती. आस्था ग्रुपने सन २०१२-१३ कालावधीत विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्टकडे २१.७४ कोटी वळते केले. त्यापैकी ११.३५ कोटी विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडकडे वळते करण्यात आले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याची माहिती ईडीने दिली.

ईडीने पैशांच्या या साखळीचा तपास केल्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली असून त्यांच्या नावे असणारे दोन फ्लॅट आणि जमिनीचा भाग जप्त केला आहे. याची एकूण किंमत ११.३५ कोटी आहे.

ईडीने आतापर्यंत या घोटाळा प्रकरणी ३२५४.२ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीकडून अद्यापही तपास सुरु आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed attaches assets amounting to 11 35 crore of shivsene pratap sarnaik in nsel scam sgy
First published on: 25-03-2022 at 13:07 IST