मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रेलिगेअर एन्टरप्रायझेस प्रा. लि., दिल्लीच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. रश्मी सलुजा यांच्यासह तिघांविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून त्याअंतर्गत शुक्रवारी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीचा बर्मन कुटुंबीयांबाबत चुकीची माहिती देणे व त्याआधारे १७९ कोटी रुपयांचा बेकायदेशीर फायदा घेतल्याचा आरोप केला आहे. कंपनीचे सीएफओ नितीन अग्रवाल व अध्यक्ष निशांत सिंगल यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. ईडीचे साहाय्यक संचालक राम नारायण यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, ईडी मलविंदर मोहन सिंह आणि इतरांविरुद्ध प्रकरणाचा तपास करत होते. हे प्रकरण कोर्टाच्या आदेशाने दाखल केलेले फौजदारी प्रकरण (एमईसीआर) असून त्यानुसार ११ नोव्हेंबर २०२३ रोजी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा >>> पुतळ्यांची उंची ठरविण्यासाठी धोरणात बदल; तज्ज्ञ समितीची शिफारस, लवकरच १५ दिवसांत घोषणेची शक्यता

हे प्रकरण वैभव जालिंदर गवळी (रिलिगेअर एंटरप्रायझेस लि. चे शेअर होल्डर) यांनी दाखल केले होते. त्यात त्यांनी माजी संचालक मलविंदर मोहन सिंह आणि शिविंदर मोहन सिंह यांच्यावर बर्मन कुटुंबाच्या सहकार्याने रेलिगेअर एंटरप्रायझेस लि. च्या मालमत्तांचा अपहार केल्याचा आरोप केला होता. तपासादरम्यान, ईडीने गवळी यांना आर्थिक अनियमितता आणि बर्मन कुटुंबाचा त्यात सहभाग होता.

१७९ कोटी ५४ लाखांचा नियमबाह्य फायदा

नव्या गुन्ह्यातील तक्रारीनुसार, सलुजा व इतर अधिकाऱ्यांनी एम्प्लॉई स्टॉक ओव्हनरशिप प्लानद्वारे निधी वळवण्यात आला. त्याद्वारे एकूण १७९ कोटी ५४ लाख रुपयांचा बेकायदेशीर फायदा घेण्यात आला. याप्रकरणी ईडीने २१ ऑगस्ट २०२४ रोजी दिल्ली आणि गुरुग्राम येथील चार ठिकाणी छापे मारले होते. या नवीन गुन्ह्याप्रकरणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.