लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अमलीपदार्थ तस्कर अली असगर शिराझी विरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. शिराझीसह इतर साथीदार व त्यांच्याशी संबंधीत कंपन्यांच्या नावांचाही समावेश आरोपपत्रात करण्यात आला आहे. विशेष न्यायायलय आज या प्रकरणाची दखल घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ईडीने याप्रकरणी पाच कोटी ३७ लाख रुपयांच्या मालमत्तेवर नुकतीच टाच आणली होती. त्यात सात स्थावर मालमत्तांचा समावेश असून त्यांची किंमत सुमारे पाच कोटी रुपये आहे. या मालमत्ता सदनिका, दुकान व जमीन या स्वरूपात असून अली असगर शिराझी, मेहरीन शिराझी, अब्दुल समद, मनोज पटेल आणि भावेश शाह यांच्या नावावर आहेत. याशिवाय रामलखन पटेल, शोभा पटेल आणि मेसर्स हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट यांच्या नावावर बँकेत ३६ लाख ८१ हजार रुपयांच्या मुदत ठेवी होत्या.

आणखी वाचा-मुंबई ते नागपूर अंतर जुलैपासून आठ तासांत; भरवीर ते इगतपुरी टप्पा आजपासून सेवेत

याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मुंबईतील जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. त्याच आधारे ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. अली असगर शिराझी आणि साथीदार अंमलीपदार्थ तस्करीत सक्रीय होते. कॉल सेंटर्स, संकेतस्थळ चालवणाऱ्या दूरसंचार कंपन्या, लॉजिस्टिक कंपन्या, सल्लागार कंपन्या आणि बनावट औषध कंपन्या यांच्या माध्यमातून अमली पदार्थ परदेशात पाठवण्यात येत होते. बेकायदेशीर शिपिंग आणि इतर कंपन्यांमार्फत विक्रीची रक्कम चलनात आणण्यात येत होती. भारतातील कॉल सेंटर्समार्फत अमेरिका आणि यूकेमधून अमली पदार्थांची मागणी कळवण्यात येत होती. त्यानंतर बनावट औषध कंपन्या अमली पदार्थ खरेदी करीत होत्या. लॉजिस्टिक कंपन्यांद्वारे ते भारताबाहेर नेण्यात येत होते. अमली पदार्थांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम चलनात आणण्यासाठी लॉजिस्टिक आणि कन्सल्टन्सी कंपन्यांचे जाळे वापरले जायचे. या टोळीशी संबंधित विविध कंपन्या अमेरिकेत पेमेंट गेट वे चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचा वापर करून ही रक्कम भारतात आणण्यात येत होती.

आणखी वाचा-मुंबईत का जाणवतोय गारवा ? पुढील दोन दिवस…

आरोपी अली असगर शिराझी आणि संबंधित व्यक्ती तसेच संस्था यांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख ठेवी आहेत. अमली पदार्थ विक्रीतून कमवलेल्या ४४ कोटी ५० लाख रुपयांची माहिती ईडीला मिळाली आहे. यापूर्वी, ईडीने याप्रकरणी विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. त्यात सुमारे दोन कोटी ९० लाख रुपये बँक खात्यातील ठेवी, मुदत ठेवी व सोने जप्त अथवा गोठवण्यात आले आहे. याप्रकरणी ईडीने ५ जानेवारी रोजी शिराझीला अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.