मुंबई : महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांच्याविरोधात याचिका नेमकी कशासाठी केली आहे हेच माहिती नाही, असे खुद्द याचिकाकर्त्यां सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान सांगितले. त्यावर, ईडीच्या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त करून तुम्ही काय आणि कशासाठी याचिका केली आहे हेही तुम्हाला कसे माहिती नाही? अशी विचारणा ईडीकडे केली.
महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी भुजबळ आणि समीर यांच्याविरोधात ईडीने २०१८ मध्ये याचिका केली होती. या याचिकेवर, आतापर्यंत एकदाही सुनावणी झालेली नाही. न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठासमोर बुधवारी ही याचिका सुनावणीसाठी आली. त्या वेळी भुजबळ आणि समीर यांच्याविरोधात दाखल केलेल्या स्वत:च्याच याचिकेची प्रत सापडत नसल्याचे ईडीच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, कागदपत्रे शोधण्यासाठी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली.




त्यावर, हे प्रकरण आहे तरी काय? याचिका नेमकी कशासाठी करण्यात आली आहे? अशी विचारणा न्यायमूर्ती लढ्ढा यांनी ईडीच्या वकिलांकडे केली. त्या वेळी याचिकेशी संबंधित कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे आणि त्यामुळे याचिकेबाबत आपल्याला काहीच सांगता येत नसल्याचेही वकिलाने सांगितले. तेव्हा, आम्हाला फक्त हे प्रकरण काय आहे, हे सांगा, असे न्यायालयाने सुनावले. त्याच वेळी, तुम्हाला स्वत:चेच प्रकरण काय आहे हे माहीत नाही का, असा प्रश्न करून ईडीच्या दाव्यावर आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली. तसेच, याचिकेवरील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी ठेवली.