मुंबई:  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची दिल्लीतील सक्तवसुली संचालनालयाच्या( ईडी) दिल्ली येथील कार्यालयात मंगळवारी चौकशी करण्यात आली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) प्रकरणात ईडीने त्यांना समन्स बजावले होते. पांडे हे ३० जूनला मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाले होते.

ईडीने नॅशनल स्टॉक एक्स्चेंजप्रकरणी पांडे यांना २ जुलैला समन्स बजाविले होते. एनएसई गैरव्यवहार प्रकरणात २०१८ मध्ये नोंदवलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) गुन्ह्यांच्या आधारे ईडी तपास करत आहे. त्यासाठी पांडे मंगळवारी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी ईडीच्या दिल्ली कार्यालयात हजर झाले. प्रसिद्ध माध्यमांचा गराडा चुकवून ते रिक्षातून ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडीने या वेळी त्यांचा जबाब नोंदवला. सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास ईडी कार्यालयातून बाहेर पडले. सुमारे आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली. पांडे यांनी २००१ मध्ये पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिल्यानंतर आयसेक सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी सुरू केली होती. त्या वेळी तांत्रिक कारणामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत हजर राहावे लागले. त्यामुळे २००६ मध्ये संजय पांडे यांनी आपल्या कंपनीत आई आणि मुलाला संचालक केले. या कंपनीला एनएसईचे सव्‍‌र्हर आणि संगणकीय यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान लेखापरीक्षण करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. २०१० ते २०१५ या कालावधीत लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या आयसेक सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या लेखापरीक्षण अहवालात एनएसईमधील गैरव्यवहार का उघड झाला नाही, याबाबत ही चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.