मुंबई:  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कुटुंबाशी संबंधित आयसेक सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील एकूण १८ कोटी रुपयांच्या विविध व्यवहारांबाबत सध्या सक्तवसुली संचालनालय(ईडी) तपास करत आहे.  यामध्ये काही परदेशातील व्यवहारांचाही समावेश आहे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) को-लोकेशन गैरव्यवहारप्रकरणी सध्या ईडीदेखील तपास करत आहे.

  ईडीने या प्रकरणी संजय पांडे यांची आठ तास चौकशी केली होती.   पांडे यांच्या कुटुंबाशीच्या कंपनीशी संबंधित १८ कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराबाबत ईडी सध्या तपास करत आहे. व्यवहाराचे स्त्रोतासह हे व्यवहार कोणत्या कारणासाठी करण्यात आले होते, याबाबत तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. १९८६ च्या तुकडीचे पोलीस अधिकारी असलेले पांडे हे ३० जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून सेवेतून निवृत्त झाले होते. पांडे यांनी २००१ साली पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिल्यानंतर आयसेक सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी सुरू केली

होती. त्या वेळी तांत्रिक कारणामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत हजर राहावे लागले. या वेळी त्यांनी २००६ मध्ये कंपनीत आपल्या आईला आणि मुलाला संचालक केले. २०१० ते २०१५ या कालावधीत या कंपनीला एनएसई सव्‍‌र्हर आणि संगणकीय यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान लेखापरीक्षण करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. पण त्या काळात एनएनईमध्ये को-लोकेशन गैरव्यवहार झाला होता.

 त्याबाबत २०१८ मध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्या आधारावर ईडी या प्रकरणी तपास करत आहे. गैरव्यवहाराबाबतची माहिती आयसेक सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लेखापरिक्षणात कशी उघड झाली नाही, याबाबत सीबीआय तपास करत आहे. याशिवाय आरोपींनी २००९ ते २०१७ या काळात भारतीय टेलिग्राफ कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून एनएसई कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण करण्यात आल्याचा आरोप आहे.