लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंंबईः परकीय चलन व्यवस्थापन कायद्या(फेमा) अंतर्गत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबई आणि कोलकाता येथे शोध मोहिम राबवल्याची माहिती बुधवारी दिली. या कारवाईत १२ लाख ९६ हजार रुपयांचे विदेशी चलन व परदेशी बँक खाती, यांच्याशी संबंधीत कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.ॲक्सिस म्युच्युअल फंडचे माजी फंड मॅनेजर विरेश जोशी आणि इतरांवर कथित फ्रंट-रनिंगद्वारे सुमारे ३० कोटी ५६ लाख रुपयांचा अवैध फायदा मिळवल्याचा आरोप आहे. याबाबत सेबीने दिलेल्या आदेशाच्या आधारे ईडीने याप्रकरणी तपासाला सुरूवात केली होती.
फ्रंट रनिंगमध्ये एखाद्या दलाल किंवा व्यापाऱ्याने त्यांच्या ग्राहकांच्या प्रलंबित खरेदी-विक्रीची माहिती वापरून स्वतःच्या फायद्यासाठी व्यवहार करणे बेकायदेशीर आहे. या गैरव्यवहारात विरेश जोशी यांनी गोपनीय माहिती दुबईत टर्मिनल असलेल्या दलालांना दिल्याचा आरोप आहे. त्या दलालांनी भारतातील दलालांनाही याबाबतची माहिती दिली. याप्रकरणात झालेल्या फायद्याची रक्कम कोलकातातील बनावट कंपन्यांच्या माध्यांतून बँक खात्यात वळवण्यात आल्याचा संशय आहे. ती रक्कम कर्जाच्या स्वरूपात जोशी यांच्याशी संबंधीत व्यक्ती कंपन्यांना मिळाल्याचा आरोप आहे. याशिवाय या रकमेतून युकेमध्ये मालमत्ता खरेदी करण्यात आली. दुबई व युकेमध्ये दोन कंपन्याही स्थापन करण्यात आल्या. या प्रकरणातील सुमारे १२ कोटी रुपयांच्या व्यवहारांची माहिती ईडीला मिळाली आहे. याबाबत ई़डी अधिक तपास करत आहे.