उद्योगपती राज कुंद्रा विरोधातील तपासाला सुरुवात 

या कंपनीच्या माध्यमातून अश्लील चित्रफिती प्रसारणासाठी तयार करण्यात आलेले ‘हॉटशॉट्स’ नावाचे अ‍ॅप्लिकेशन लंडनस्थित कंपनीला विकले.

मुंबई : उद्योजक राज कुंद्रा याच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी अश्लील चित्रपट निर्मिती केल्याप्रकरणी २०२१ मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर ईडीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांबाबत ईडीने तपासाला सुरुवात केली आहे.

अश्लील चित्रपट निर्मिती करण्यासाठी कुंद्रा यांनी २०१९ मध्ये ‘आर्म्स प्राइम मीडिया ’ नावाने कंपनी स्थापन केल्याचा आरोप आहे. या कंपनीच्या माध्यमातून अश्लील चित्रफिती प्रसारणासाठी तयार करण्यात आलेले ‘हॉटशॉट्स’ नावाचे अ‍ॅप्लिकेशन लंडनस्थित कंपनीला विकले. पण या अ‍ॅप्लिकेशनबाबतची बरीच कामे कुंद्रामार्फतच चालू होती, असा आरोप आहे. याप्रकरणी

मालमत्ता कक्षाने कारवाई करून कुंद्रासह या अश्लील अ‍ॅप्लिकेशनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अटक केली. कुंद्राने ‘हॉटशॉट’ अ‍ॅप्लिकेशन प्रदीप बक्षीला विकल्याचा दावा केला होता. बक्षी हा राज कुंद्राचा नातेवाईक आहे. पुढे तपासात व्हॉट्सअ‍ॅप संदेशांद्वारे कुंद्रा नियमित या अ‍ॅप्लिकेशनच्या व्यवहारांची माहिती घेत होता, असा आरोप आहे.

कुंद्रा याच्याविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केल्याबाबत कोणतीही माहिती आम्हाला प्राप्त झाली नसल्याचे त्याचे वकील प्रशांत पाटील यांनी सांगितले. पण त्यात तथ्य असेल, तर राज कुंद्रा ईडीला पूर्णपणे सहकार्य करेल. मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात आरोपपत्र दाखल केले असून ते न्यायालयासमोर प्रलंबित आहे. या प्रकरणात गुन्ह्यातून कमावलेल्या पैशांबाबत कोणताही आरोप नाही. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या संपूर्ण आरोपपत्रात मनी लाँडिरगप्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी संदर्भातील कोणतेही आरोप नाहीत. आमचा तपासावर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही आमच्या क्षमतेनुसार तपासाला सहकार्य करू, असेही कुंद्रा यांचे वकिल प्रशांत पाटील यांनी सांगितले.

ईडी काय करणार?

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लॅपटॉप जप्त केले होते. त्यातील डेटामध्ये ‘हॉटशॉट’च्या १०० चित्रफीतींचा समावेश आहे. याशिवाय पोलिसांना उपलब्ध झालेल्या माहितीवरुन कुंद्रा यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट ही मिळाले होते. त्यात काही व्यवहारांची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या अश्लील चित्रफीतींमार्फत एक कोटी १७ लाख रुपये कमवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या अ‍ॅप्लिकेशनचे २० लाख ग्राहक असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ईडी आता या व्यवहारांची तपासणी करणार आहे. त्यासाठी ईडी लवकरच कुंद्राला समन्स बजावण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ed registers money laundering case against raj kundra zws

Next Story
इंद्राणी मुखर्जीची दोन लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका ; सीबीआय न्यायालयाकडून जामिनाच्या अटी निश्चित
फोटो गॅलरी