मुंबई…आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात मोठ्या संख्येने सरकारी कार्यालये असून बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये, बँकांची कार्यालये आणि अनेक संस्थांची कार्यालये आहेत. त्यात आता लवकरच सक्तवसुली संचालनालय (ईडी), भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाची (एनएसई) कार्यालये स्थापण्यात येणार आहेत. या तिन्ही संस्थांना बीकेसीतील भूखंडांचे वाटप बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आता लवकरच या संस्थांच्या कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामाला सुरुवात होईल.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बीकेसीचा विकास आर्थिक केंद्र म्हणून करण्यात आला असून आता बीकेसीचा विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून केला जात आहे. यासाठी येथे मेट्रोसह अन्य पायाभूत सुविधा पुरविल्या जात आहेत. तर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, बीकेसीमध्ये नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई), नाबार्ड, भारतीय रिझर्व्ह बँक, आयसीआयसीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया, गूगल इंडिया, रिलायन्स, टाटा समूह, भारत डायमंड बोर्स, अमेरिकन दूतावास, आयकर भवन यासह एमएमआरडीएची कार्यालये आहेत. तर या ठिकाणच्या भूखंडांनाही मोठी मागणी असते.

अशात बीकेसीत मुख्यालयासाठी, कार्यालयासाठी जागा देण्याची मागणी अनेक सरकारी संस्थांकडून होते. त्यानुसार सेबी, ईडी आणि एनएसईकडून बीकेसीतील जागेची मागणी एमएमआरडीएकडे करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून एमएमआरडीएने बीकेसीतील जागा या संस्थांना देण्याचा निर्णय घेतला होता. तर आता प्रत्यक्षात या तिन्ही संस्थांना बुधवारी भूखंडांचे वाटप करण्यात आले.

सेबीला १६,००० चौ.मी. बांधकामयोग्य क्षेत्राचे वाटप करण्यात आले असून त्यासाठी ६०६.३२ कोटी रुपये इतकी किंमत आकारण्यात आली आहे. एनएसईला ४३,९८० चौ.मी. क्षेत्रासाठी १,६८४.३२ कोटी रुपये, तर ईडीला १०,५०० चौ.मी. क्षेत्रासाठी ३६१.७३ कोटी रुपये इतकी किंमत आकारण्यात आली आहे. या भूखंड विक्रीतून एमएमआरडीएला एकूण २,६५२.३७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. हा निधी आता मेट्रोसह इतर प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे.