मुंबई : एल – निनोमुळे देशभरात झालेला अपुरा पाऊस, खरीप हंगामातील तेलबिया पिकांचे झालेले नुकसान आणि रब्बी हंगामावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. आगामी दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचा तुटवडा जाणवू नये, दर नियंत्रणात रहावेत, या उद्देशाने केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात मोठी कपात केली आहे. या निर्णयामुळे आयात वृद्धी होऊन, दर नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे.

गतवर्षी दमदार पावसामुळे देशभरात तेलबियांच्या उत्पादनात चांगली वाढ होण्याची शक्यता होती. तेलबियांना चांगला दर मिळावा म्हणून गतवर्षी दिवाळीच्या तोंडावरच आयात शुल्कात वाढ केली होती. यंदा परिस्थिती थेट विरुद्ध निर्माण झाली आहे. त्यामुळे देशात खाद्यतेलाचा तुटवडा जाणवू नये, दर नियंत्रणात रहावेत यासाठी आयात शुल्कात कपातीची निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

शुद्ध सूर्यफूल, सोयाबीनवरील कर ११ टक्क्यांनी कपात

कच्च्या पामतेलावरील आयात कर १६.५० टक्क्यांवरून ११ टक्के, आरबीडी पामतेल ३५.७५ टक्क्यांवरून ३०.२५ टक्के, आरबीडी पामोलिन तेल ३५.७५ टक्क्यांवरून ३०.२५ टक्के, कच्चे सोयाबीन तेल १६.५० टक्क्यांवरून ११.०० टक्के, शुद्ध सोयाबीन तेल ३५.७५ टक्क्यांवरून ३०.२५ टक्के, कच्चे सूर्यफूल १६.५० टक्क्यांवरून ५.५० आणि शुद्ध सूर्यफूल तेलाचा आयात कर ३५.७५ टक्क्यांवरून २४.७५ टक्के करण्यात आला आहे.

दर नियंत्रणात राहण्यासाठी निर्णय

गतवर्षाच्या तुलनेत सध्या जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या दरात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, देशांतर्गत बाजारात १२ ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आगामी सण – उत्सवाच्या खाद्यतेलाचे दर नियंत्रणात राहण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आयात कपातीचा परिणाम आगामी दसरा, दिवाळीत दिसून येईल, असे द सॉलव्ंहट एक्स्ट्रॅक्टर्स असोशिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) अध्यक्ष कार्यकारी बी. व्ही. मेहता यांनी म्हटले आहे.