मुंबई: नागपूरमध्ये उघडकीस आलेल्या बनावट शिक्षक ओळख क्रमांक (शालार्थ आयडी) घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून राज्याच्या अनेक भागातून अशाच तक्रारी येत आहेत. सरकारे या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून वरिष्ट सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाच्या(एसआयटी) माध्यमातून या घोटाळ्याची तीन महिन्यांत चौकशी केली जाईल. यातील दोषींवर कठोर कारवाई करतानाच त्यांच्याकडून अपहाराची सर्व रक्कम वसूल करण्यात येईल , अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
नागपूरसह काही जिल्हयात बोगस शिक्षक ओखळ क्रमांक (शालार्थ आयडी) अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे पात्र शिक्षकांच्या यादीत घूसवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली आहे. भाजपाचे प्रविण लटके, प्रशांत बंब, नरेंद्र बोंडे आदींनी लक्षेवधीच्या माध्यमातून या गंभीर घोटाळ्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. नागपूरमध्ये शिक्षण संस्था, शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी संगनमताने मृत शिक्षणाधिकाऱ्याच्या बोगस सह्या तसेच बनावट शालार्थ आयडीच्या माध्यातून सन २०१२ ते २०१९ या दरम्यान सरकारचे कोट्यावधी रुपये लाटले.
या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असून राज्यातील अनेक जिल्ह्यात अशाचप्रकारे बोगस शिक्षकांच्या नावे वेतन व भत्यांच्या माध्यमातून सरकारला फसवण्यात आले आहे. या घोटाळ्यातील सर्व दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी सदस्यांनी केली. शिक्षण मंत्र्यांच्या नाशिक जिल्हयात विशेषत: मालेगावमध्येही शिक्षण विभागात मोठा घोटाळा झाला असून शिक्षण विभागाचे अधिकारी २० वर्षापासून मालेगावमध्येच ठाण मांडून बसल्याचा आरोप काही सदस्यांनी केला.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही नागपूरमध्ये मोठा घोटाळा झाल्याची आणि त्याची व्याप्ती अन्य जिल्ह्यातही असल्याची कबुली देताना संपूर्ण राज्यातच अशा प्रकारच्या तक्रारी येत असून त्याची चौकशी करण्याची घोषणा केली. राज्यात गेल्या काही वर्षांपासून हा घोटाळा सुरू असून त्याची विशेष तपास पथकाच्या माध्यमातून चौकशी केली जाईल. एसआयटीमध्ये वरिष्ठ सनदी, पोलीस अधिकारी आणि विधि व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
तीन-चार महिन्यात ही चौकशी पूर्ण केली जाईल. त्यात दोषी आढळणाऱ्या शिक्षण विभागील अधिकारी, संस्था चालक, मुख्याध्यापक आणि बोगस शिक्षकांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच त्यांनी आजवर घेतलेल्या वेतनाची पूर्ण वसूली केली जाईल असेही भूसे यांनी सांगितले. नागपूरमधील घोटाळयात १९ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस आणि शिक्षण विभागाच्या योजना संचालकाच्या माध्यमातून स्वतंत्र चौकशी सुरूआहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.