scorecardresearch

विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊ नये ; दहावी-बारावीच्या परीक्षांवर चर्चेची तयारी; शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांची भूमिका

या आंदोलनामागे ज्या व्यक्ती किंवा संघटना आहेत, त्यांनी सरकारला सूचना केल्यास चर्चा केली जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षांबाबतच्या सूचनांवर राज्य सरकारची चर्चेची तयारी असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी सांगितले. मात्र मुलांच्या भावना भडकावून त्यांना रस्त्यावर आणू नये, असे आवाहन गायकवाड यांनी केले.

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, त्या ऑनलाइन घ्याव्यात, या मागणीसाठी मुंबई, नागपूर, उस्मानाबाद यासह अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलन केले. राज्यातील भौगोलिक परिस्थिती प्रत्येक विभागात वेगवेगळी आहे. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता आणि आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या उपलब्धतेचा विचार करता या परीक्षा ऑनलाइन घेणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला शक्य नाही. करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार परीक्षा केंद्रांवरच (ऑफलान) घेतल्या जाणार आहेत. मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या मुलांच्या परीक्षेसंबंधी काही सूचना असतील, तर त्या शिक्षण विभागाला कराव्यात. परंतु विद्यार्थ्यांना भडकावून आंदोलने करु नये, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.शाळेतील विद्यार्थ्यांना सध्या दोन आघाडय़ांवर लढावे लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाळेत प्रत्यक्ष शिक्षण मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याने पोकळी निर्माण झाली आहे आणि करोनाचाही सामना करावा लागत आहे. या आंदोलनामागे ज्या व्यक्ती किंवा संघटना आहेत, त्यांनी सरकारला सूचना केल्यास चर्चा केली जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना पुढे करून राजकारण करू नये -पटोले

राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून विद्यार्थ्यांना पुढे करून कोणीही राजकारण करू नये, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे चुकीचे असून परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याची मागणीही अनेकांनी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून आंदोलन करणे चुकीचे असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पटोले यांनी केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Education minister varshan gaikwad ready to talk with students on exam isuue zws

ताज्या बातम्या