मुंबई :  पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंच्या वाटपाला यावर्षी विलंब झाल्यामुळे पालिकेवर टीका होऊ लागली आहे. मात्र जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून काही वस्तू वाटपाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाने व्यक्त केली असून आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर छत्रीसाठी २७० रुपये देण्यात येणार आहेत.

पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना दरवर्षी २७ शैक्षणिक वस्तूंचे मोफत वाटप केले जाते. यंदा मात्र यंदा अद्यापही याबाबत कार्यवाही न झाल्याने पालिकेवर टीका होऊ लागली. पावसाळा सुरू झाला तरी मुलांना दप्तर, रेनकोट, पेन, पेन्सिल मिळालेल्या नाहीत. 

भाजपच्या लोकप्रतिनिधींनी या विषयावरून पालिकेवर जोरदार टीका केली. जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून वस्तूंचे वितरण करण्यास सुरूवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र जुलै महिना उजाडला तरी विद्यार्थ्यांना वस्तू मिळाल्या नाहीत. आता जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून वस्तूंचे वितरण होईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना २०२२ व २३ या वर्षांसाठी शालोपयोगी वस्तू – वह्या, रेनकोट आदी देण्यासाठी निविदा प्रक्रिया मुंबई महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत पूर्ण झाली असून कंत्राटदारास खरेदी आदेश देण्यात आलेले आहेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

या वर्षांपासून मुलांना नवीन रंगसंगतीचे आकर्षक गणवेश देण्यात येणार आहे. लवकरच या वस्तू देखील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर शाळेच्या पहिल्या दिवशी पाठय़-पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच या शैक्षणिक वर्षांत प्रायोगिक तत्त्वावर प्रथमच आठवी ते दहावीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांला छत्री खरेदी करण्यासाठी २७० रुपये रोख स्वरूपात देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर अन्य विद्यार्थ्यांना पुढच्या आठवडय़ात रेनकोट उपलब्ध  होणार आहेत.

रक्कम अशी ..

पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे बॅंक खाते नाही, त्यामुळे ही रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षक व मुख्याध्यापकांच्या त्रिसदस्यीय समितीद्वारे पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना ही रोख रक्कम दिली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या पद्धतीमुळे निविदा प्रक्रियेत अडकण्यापेक्षा विद्यार्थ्यांना स्वत:च्या आवडीप्रमाणे छत्री घेता येईल, असा प्रयत्न आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.