कमी दाबाचा पट्टा किनारपट्टीपासून दूर

मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र येत्या २४ तासांत दाट होण्याची शक्यता आहे; मात्र ते किनारपट्टीपासून दूर जात असल्याने रविवारपासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. सोमवारी पाऊस आणखी कमी होऊन किमान तापमानातही घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात शनिवारी काही ठिकाणी पाऊस झाला. ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे रविवारीही ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईतही काही भागांत पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्राने शनिवारी सकाळी ८.३० वाजता १०.२ मिमी असा २४ तासांचा पाऊस नोंदवला.

 पुणे येथे १ ऑक्टोबरपासून १४३.३ मिमी, पाषाण येथे ९२.२ मिमी, लोहगाव येथे १८० मिमी, कुलाबा येथे ५७.८ मिमी, सांताक्रूझ येथे ११.२ मिमी, पणजी येथे २८४.२ मिमी पाऊस नोंदवला गेला. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र  किनारपट्टीपासून दूर जात असल्याने पुढील दोन दिवसांत पाऊस कमी होण्याची शक्यता असली तरी त्याचा प्रभाव  २ दिवस  राहणार आहे.

तापमानात घट

मुंबईतील ढगाळ वातावरणाचा प्रभाव म्हणून कुलाबा येथे शनिवारी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांनी तर किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एका अंशाने घट झाली.  येथे ३१.६ अंश सेल्सिअस कमाल तर २३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.  सांताक्रूझ येथे कमाल तापमानात घट होऊन ते ३३.९ अंश सेल्सिअस असे नोंदवले गेले. किमान तापमान २५.४ अंश सेल्सिअस होते. यात मात्र सरासरीच्या तुलनेत तीन अंशांची वाढ दिसून आली.