scorecardresearch

आंतरराष्ट्रीय व्यापारात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा!, जी -२० च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटातील सूर

जागतिक व्यापारात आपला  हिस्सा वाढवण्यासाठी भारताने डीजिटलीकरणावर भर देण्याची आवश्यकता केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी व्यक्त केली.

india g20
जी -२० च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटातील सूर (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई : आंतरराष्ट्रीय व्यापारात  तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा आहे.  डिजिटलीकरणाकरिता मानके आणि विदा (डेटा) यात सुसूत्रता आणण्याकरिता आंतरराष्ट्रीय पातळीवर सहमती घडवून आणणे आवश्यक आहे, असे मत जी- २० राष्ट्रांच्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या बैठकीत  विविध तज्ज्ञांनी मंगळवारी व्यक्त केले. तर जागतिक व्यापारात आपला  हिस्सा वाढवण्यासाठी भारताने डीजिटलीकरणावर भर देण्याची आवश्यकता केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी व्यक्त केली.

जी – २० राष्ट्रांच्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या तीन दिवसांच्या बैठकीला आज सुरुवात झाली. दोन सत्रांत जागतिक व्यापारातील अस्थिर परिस्थितीत व्यापार आणि वित्तपुरवठय़ातील आव्हाने तसेच डिजिटलीकरण व आर्थिक व्यवहारात तंत्रज्ञानाचा वापर यावर साधकबाधक चर्चा करण्यात आली. विविध देशांमधील सुमारे १०० पेक्षा अधिक तज्ज्ञ कार्यगटाच्या बैठकीत सहभागी झाले आहेत.

जागतिक पातळीवर व्यापारवृद्धीसाठी ‘जी-२०’ च्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन परस्परांना पूरक ठरणारे कायदे तसचे धोरणे स्वीकारावीत, असे आवाहनही बर्थवाल यांनी या वेळी केले. करोनानंतर जगभरात चलनवलनाची दशा आणि दिशा बदलली. डिजिटलीकरणास मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाली. भारतात डिजिटलीकरणाने वेग घेतला  मात्र जागतिक व्यापारात आपला हिस्सा आणखी वाढवायचा असेल तर डिजिटलीकरणावर भर देण्याची गरज आहे. जी-२० हा  सदस्य गट  आपल्यासाठी फार मोठी संधी आहे. या सदस्यांच्या सहकार्याने आपल्या व्यापारात वाढ करण्याची संधी चालून आली आहे.

सर्व देशांतून सहभागी झालेल्या व्यापारी शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींना आवाहन करताना बर्थवाल म्हणाले, पुढील काही वर्षांत जागतिक पातळीवर सर्व देशांनी कागदविरहित व्यापाराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आतापासून प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक ते कायदे करण्याची मानसिकता अंगीकारली पाहिजे. व्यापार व वित्तीय क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर आत्ताच विचार करायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.  या वेळी दोन चर्चा सत्रे पार पडली. ‘व्यापारासाठी वित्तपुरवठा आणि त्यातील आव्हाने’ या विषयावर बोलताना आशियाई विकास बॅंकेचे  स्टीवन बेक, जर्मनीतील ओफनबर्ग विद्यापीठाचे प्रो. अंड्रेस क्लेसन व स्टॅन्डर्ड चार्टर्डचे गौरव भटनागार यांनी व्यापारासाठी वित्तपुरवठा किती महत्त्वाचा असतो. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी पुरेशी खेळती गंगाजळी हातात असणे, याचे महत्त्व विशद केले. तर ‘आंतरराष्ट्रीय व्यापार आणि  डिजिटलीकरण’ या विषयावर सौदी अरेबियाचे फरीद अलासली, भारताचे केतन गायकवाड यांनी  डिजिटलीकरण ही काळाची गरज झाली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात जितके डिजिटलीकरण जास्त प्रमाणात होईल तितकी व्यापारवृद्धी होण्यास मदत होणार आहे, असे मत मांडले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 00:56 IST

संबंधित बातम्या