मुंबई : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी त्याचे मतांमध्ये  रूपांतर होणे आव्हानात्मक आहे. पण त्याचबरोबर मराठा, मुस्लीम, दलित, आदिवासी या हक्काच्या दूर गेलेल्या मतदारांना परत कसे जोडता येईल याचा पक्षाने गांभीर्याने विचार करावा, असा सूर प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत बुधवारी व्यक्त करण्यात आला.

नाशिक पदवीधर मतदारसंघात झालेला गोंधळ, त्यावरून विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची नाराजी या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस पक्ष एकसंध असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेसमध्ये कसलीही नाराजी नाही. विधान परिषद निवडणुकीतील अपयश आल्याने लक्ष विचलित करण्याकरिता भाजपकडून काँग्रेसमधील फुटीच्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्याचा निर्धारही करण्यात आला.  काँग्रेसची  राज्यात हक्काची अशी मतपेढी होती. मराठा, दलित, मुस्लीम, आदिवासी मतदार ठामपणे काँग्रेसच्या मागे उभे राहात असत. पण गेल्या काही वर्षांत हा जनाधार का दुरावला याचा विचार होणे आवश्यक आहे, असे परखड मत माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. या साऱ्या समाजघटकांना पुन्हा जोडण्याकरिता आतापासूनच प्रयत्न झाले पाहिजेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
bsp mayavati
भाजप सत्तेत परतणे कठीण! मायावती यांच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

  केंद्रात सहा दशके काँग्रेसची सत्ता असताना देशाची उभारणी करण्याचे महत्त्वाचे काम झाले होते. पण त्याला छेद देण्याचा प्रयम्त्न मोदी सरकारकडून सुरू असल्याचा मुद्दाही मुणगेकर यांनी मांडला. २०१४ मध्ये भाजपला ३१ टक्के तर २०१९ मध्ये ३७ टक्के मते देशात भाजपला मिळाली होती. याचाच अर्थ ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदार हे भाजपच्या विरोधात आहेत. या मतदारांना संघटित करण्यावर पक्षाने भर दिला पाहिजे, असे मत खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केले.

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल पक्षाच्या बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले. पण यात्रेला प्रतिसाद मिळाला तरी त्याचे मतांमध्ये परिवर्तन होणे कठीण आहे, अशी चिंताही बैठकीत व्यक्त करण्यात आली. एका चळवळीला यश आले तरी त्याचे लगेचच मतांमध्ये रूपांतर होत नसते. त्यासाठी काही कालावधी जातो, असे मुणगेकर यांनी रशियातील लेनिनच्या चळवळीचे उदाहरण देत निदर्शनास आणून दिले.

विधान परिषदेच्या नागपूर आणि अमरावती मतदारसंघांमधील विजय ही विजयाची पहिली पायरी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीकरिता आतापासूनच प्रयत्न केल्यास पक्षाला निश्चित चांगले यश मिळेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. पराभवाच्या भीतीनेच महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका टाळल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस पक्षच आता आशेचा किरण असल्याची भावना विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.