किरकोळ बाजारपेठेत अंडयांची मागणी वाढली असून वांद्रयामध्ये एक डझन अंडयांचे दर ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गोरेगावमध्ये ७२ आणि वाशी बाजारपेठेत एक डझन अंडयांचा दर ६५ ते ७० रुपये आहे. मान्सूनच्या काळात कोंबडयांचे अंडी देण्याचे प्रमाण कमी असते. त्याशिवाय निर्यातही उत्तम सुरु आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यात अंडयांचे दर आणखी वाढू शकतात असे चेन्नईतील एका अंडयांच्या घाऊक विक्रेत्याने सांगितले.

चेन्नई हे देशातील कुक्कुटपालनाचे मुख्य केंद्र आहे. सध्या एका अंडयाचा दर ४ रुपये ५० पैसे आहे. वाहतूक खर्च पकडून ती किंमत ४ रुपये ९० पैसे होते. मान्सूनच्या आधी एका अंडयाची किंमत ४ रुपये २५ पैसे होती. पुढच्या काही महिन्यात एका अंडयाचा दर ५ रुपये १० पैसे होईल अशी माहिती चेन्नईच्या श्रीसुक्तम सोल्युशन्सचे श्रीधर यांनी दिली.

ओमान, कतार, दुबई आणि काही आफ्रिकन देशांमधून अंडयांना चांगली मागणी आहे. चेन्नईमधून ८० देशांमध्ये अंडयांची निर्यात केली जाते असे श्रीधर यांनी सांगितले. श्रावण सुरु होईपर्यंत अंडयांचे दर चढेच राहतील असे श्रीधर यांनी सांगितले. श्रावणात महिनाभर लोक शाकाहाराला प्राधान्य देतात. त्यावेळी अंडयांचे दर खाली येतील.