मुंबई : यंदाच्या उन्हाळ्यातील असह्य तापमानामुळे सरासरी १५ टक्के कोंबड्यांची मर झाल्यामुळे अंडी देण्या योग्य कोंबड्यांचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी राज्यातील अंडी उत्पादनात सरासरी १५ टक्क्यांनी घट झाली आहे. शिवाय लहान पिलांसाठी चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने मुंबई, पुण्यात अंड्याची किरकोळ विक्री ८ ते १० रुपयांवर गेली आहे. पुढील काही महिने अंड्याचे दर चढे राहण्याची शक्यता आहे.

असह्य उन्हाळ्यामुळे कोंबड्या मृत्युमुखी पडल्या

यंदाच्या उन्हाळ्यात राज्याचे तापमान सरासरी ३५ अंशांच्या वर गेल्यामुळे कोंबड्यांची सरासरी १५ टक्के मर झाली आहे. साधारणपणे ३८ अंशांच्या वर तापमान गेल्यानंतर कोंबड्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढते. तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पोल्ट्री चालकांनी अनेक प्रयत्न करून सुद्धा महाराष्ट्रसह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश पंजाब आदी राज्यांमध्ये कोंबड्यांची मर मोठ्या प्रमाणावर झाली होती. महाराष्ट्रात सरासरी १५ टक्के मर झाली आहे.

कोंबड्यांच्या लहान पिलांसाठी पाच महिन्यांची प्रतीक्षा

महाराष्ट्रासह अन्य राज्यांत एकाच वेळी कोंबड्याची मर जास्त झाल्यामुळे लहान पिलांना असणारी मागणी वाढली आहे. त्यामुळे यापूर्वी साधारण दोन ते तीन महिन्यांत महिने लहान पिलांसाठी प्रतीक्षा करावी लागत होती. आता साधारण चार ते पाच महिने लहान पिलांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. एक लहान पिल्लू सरासरी ५१ रूपयांना मिळते. पोल्ट्रीमध्ये आणल्यानंतर सतत लसीकरण आणि चांगली जोपासना केल्यानंतर पाच महिन्यांनी अंडी देण्यास सुरुवात करते. त्यामुळे अंड्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. अंडी देण्यायोग्य कोंबड्यांची संख्या १५ टक्क्यांनी कमी झाल्यामुळे अंडी उत्पादनात सुद्धा १५ टक्क्यांनी घट झाली आहे.

शेजारील राज्यांत अंडी उत्पादन घटले

राज्यात अंडी उत्पादनात घट झाल्यानंतर किंवा मागणी वाढल्यानंतर शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना राज्यांतून अंड्याची आयात वाढून पुरवठा साखळी सुरळीत होते. पण सध्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांत सुद्धा अंडी उत्पादनात घट झाल्यामुळे बाहेरील राज्यांतून अंडी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पुढील चार महिने अंड्यांचे दर चढे राहण्याचा अंदाज विटा (जि. सांगली) येथील पोल्ट्री उत्पादक शत्रुघ्न जाधव यांनी व्यक्त केला आहे.

कोंबडी खाद्याच्या दरात वाढ

पोल्ट्री चालकांना कोंबडी खाद्य साधारण २४ ते २६ रुपये किलो दराने कोंबडी खाद्य मिळत होते. सध्या कोंबडी खाद्याचा दर ३१ ते ३२ रुपये किलोंवर गेला आहे. सोयाबीन पेंड ६५ हजार रुपये प्रति टन तर मका २७ रुपये किलोंवर गेला आहे. कोंबडी खाद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्चात ही वाढ झाली आहे.

अन्य राज्यांतून आवक घटली

अंडी उत्पादनात १५ टक्क्यांनी घट झाली आहे. बाहेरील राज्यांतून अंडी येण्याचे प्रमाणही कमी आहे. सध्या शेतकऱ्यांना प्रती अंडे ७ ते ७.१० रुपये मिळत आहेत. मुंबई, पुण्यातील ग्राहकांना किरकोळ विक्री आठ ते दहा रुपयांनी होत आहे, अशी माहिती राष्ट्रीय अंडी समन्वय समितीचे पुणे विभागीय अध्यक्ष श्याम भगत यांनी दिली.