सहायक म्हणून काम करणारे (कंपाऊंडर) आणि जेमतेम बारावी शिकलेले बोगस डॉक्टर करोनावरही सर्रास उपचार करत असल्याचे समोर आले असून अशा तीन डॉक्टरांवर कारवाई करून गुन्हे शाखेने त्यांना घाटकोपर येथून रविवारी अटक केली. महिन्याभरात गुन्हे शाखेने गोवंडी व घाटकोपर परिसरांतून आठ बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने पोलिसांनी कारवाई केली.

घाटकोपर पूर्व येथील रमाबाई कॉलनी परिसरात करोनाकाळात तीन बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जिवाशी खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सायंकाळी परिसरातील वारे क्लिनिक, धनिस्था क्लिनिक व सरोज क्लिनिक येथे गुन्हे शाखेच्या पथकानेबनावट रुग्ण पाठवले. ते रुग्ण तेथून उपचार घेऊन बाहेर पडले असता गुन्हे शाखेचे अधिकारी व महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दवाखान्यांवर छापा टाकला. त्या तीन दवाखान्यांमध्ये रुग्णांवर उपचार करणारे भरत म्हस्के (४६), सूरज रामजी सरोज (२३) व नीलम सीताराम पासी (२३) यांना वैद्यकीय प्रमाणपत्र, महाराष्ट्र काऊंसिल ऑफ इंडियन मेडिसिन संकेतस्थळावरील नोंदणीबाबत विचारण्यात आले. त्याची कोणतीही माहिती देण्यास ते असमर्थ ठरल्यानंतर त्यांच्याकडील प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक पाहणीत ती बनावट असल्याचे सांगितल्यानंतर रविवारी याप्रकरणी फसवणूक व महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. चौकशीत आरोपींनी यापूर्वी कंपाऊंडर म्हणून काम केले असल्याचे सांगितले. त्यातील म्हस्के व सरोज यांचे १२ वीपर्यंत शिक्षण झाले आहे, तर नीलम पासीने बीएएमएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत असल्याचे सांगितले. त्याबाबत महाविद्यालयांतही पोलीस चौकशी करणार आहेत.

अनेक ठिकाणी सुळसुळाट

महिन्याभरात गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत आठ बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. गोवंडीच्या शिवाजी नगर भागात दवाखाने चालवणाऱ्या पाच बोगस डॉक्टरांना गुन्हे शाखेने अटक केली होती. अटक केलेले बोगस डॉक्टर शिवाजी नगरमधील बैगणवाडी परिसरात रुग्णांवर उपचार करत होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा सर्व प्रकार सुरू असून आणखी काही बोगस डॉक्टरांची माहिती पोलीस मिळवत आहेत.