मुंबई : राज्यभरातील महाविद्यालयीन रंगकर्मींच्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि उत्तम सादरीकरणाने झळाळून उठलेली ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. आठ विभागांतून प्राथमिक आणि अंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करून जेत्या ठरलेल्या एकांकिकांमध्ये आता महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ हा बहुमान मिळवण्यासाठी चुरशीची स्पर्धा रंगणार आहे. येत्या शनिवारी ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक-शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात ‘लोकसत्ता लोकांकिका’चा मान कोणाला मिळणार? याबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

दशकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेने गेल्या काही वर्षांत नाट्यवर्तुळात विश्वास आणि प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त केले आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या यंदाच्या पर्वाचा शेवटचा अंक येत्या शनिवारी, २० डिसेंबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरमध्ये रंगणार आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या या महाअंतिम सोहळ्यात ठाणे, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजी नगर अशा आठ विभागांतून विजेत्या ठरलेल्या आठ एकांकिका सादर होणार आहेत.

महाअंतिम सोहळ्यात उत्तम सादरीकरण करणाऱ्या महाविद्यालयाच्या एकांकिकेला या वर्षीची महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ हा बहुमान मिळणार आहे.समकालीन विषयांवर भाष्य करण्याची हातोटी, तंत्रज्ञान आणि नेपथ्य, संगीत अशा विविध घटकांचा कल्पकतेने वापर करण्याचे युवा रंगकर्मींचे कौशल्य दरवर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत पाहायला मिळते. यंदाही आठ विभागांत पार पडलेल्या प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरीत उत्तमोत्तम एकांकिका नाट्यरसिकांना पाहता आल्या.

महाअंतिम फेरीतील एकांकिका

ठाणे – थिम्मक्का – सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय

मुंबई – जब वुई मेटा – म. ल. डहाणूकर महाविद्यालय

कोल्हापूर – हाफ वे – राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय, ईश्वरपूर

पुणे – वामन आख्यान – मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड

नाशिक – राशोमोन – लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय

नागपूर – ओझोन – श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती</p>

रत्नागिरी – तुकारामाची टोपी – फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय

छत्रपती संभाजीनगर – बुजगावणं – नाट्यशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ