मुंबई : केंद्राने आखलेला ‘एक पेड मां के नाम’ या उपक्रमाचे नेमून दिलेले लक्ष्य पूर्ण न करणाऱ्या शाळांना शिक्षण विभागाने नोटीस पाठवली आहे. विविध अहवाल, महोत्सव, एसआयआरचे काम यात अडकलेल्या शाळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शिक्षण विभागाने दिलेले वेळापत्रक आणि चाचण्या हे सगळे कसे जमवायचे असा प्रश्न भेडसावत असतानाच विभागाच्या नोटीसा मुंबईतील शाळांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत.
देशभरातील शाळांमध्ये ‘इको क्लब फॉर मिशन लाईफ’ आणि ‘एक पेड माँ के नाम ३.०’ हा उपक्रम केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शाळेने ५० रोपे अथवा प्रति विद्यार्थी एक रोप लावण्याचे लक्ष्य ठेवून वृक्षारोपण करण्याबाबत सूचना शाळांना देण्यात आलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी आईबरोबर झाड लावताना छायाचित्र काढून शाळेत द्यावे, शाळेने जागा शोधून वृक्षारोपण करून त्याची छायाचित्रे अपलोड करण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र मुंबईतील अनेक शाळांनी अद्यापपर्यंत ‘इको क्लब’ची स्थापना करुन ‘एक पेड माँ के नाम ३.०’ या उपक्रमाची अंमलबजावणी दिलेल्या नियोजनानुसार अद्याप अनेक शाळांना लक्ष्य पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे मुंबई शिक्षक निरीक्षकांनी या शाळांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. लक्ष्यपूर्ती न करणाऱ्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना लेखी खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात शाळांना दूरध्वनी व व्हॉट्सॲपद्वारे कळविण्यात आले होते. केंद्र शासनाकडून कामाच्या प्रगतीचा दररोज आढावा घेतला जात असून, संबंधित विभागातील काम अद्याप अपूर्ण असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाकडूनही शाळांना कारवाईची भिती दाखवण्यात येत आहे.
नोटीस दिलेल्या शाळांपैकी अनेक शाळांनी इको क्लबसाठी नोंदणी केली आहे. तसेच काही शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी खुलासा पाठविला आहे. त्यानुसार शाळांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. – संजय जावीर, शिक्षण निरीक्षक, मुंबई पश्चिम विभाग
