पूर्वी गाजलेल्या आणि आता पुन्हा पुनरुज्जीवित झालेल्या विनोदी नाटकांचं सध्या पेव फुटलंय. परंतु का कुणास ठाऊक, आता ही नाटकं तितकीशी अपील होत नाहीत. याचं कारण बहुधा काळाबरोबर त्यातल्या विनोदाची जातकुळी संदर्भहीन झाली असावी. आज विनोद एका वेगळ्याच वळणावर आला आहे. त्यावेळच्या प्रसंगनिष्ठ विनोदांना आता हसू येत नाही. तेव्हा ज्या करामतींनी हशा फुटे, ती अवस्था आता राहिलेली नाही. काळ पुढे सरकलाय आणि त्याबरोबरच प्रेक्षकांची अभिरुचीही बदललीय. या पार्श्वभूमीवर रत्नाकर मतकरी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक नव्यानं रंगभूमीवर आलेलं आहे. आणि सानंद आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते आजही तितकंच हास्यस्फोटक वाटतं.

बबनराव बाक्रे हे फारशी प्रॅक्टिस न चालणारे वकील. परंतु तोरा असा, की आपण एक नामांंकित वकील आहोत अशा आविर्भावात ते घरीदारी वावरत असतात. त्यांची बायको बाबीताई ही टिप्पिकल गृहिणी. फारसा विचार करून वागणं-बोलणं वगैरे न झेपणारी. त्यांची सुकन्या सायली ही बकुळ धरसोड या काळे धंदे करणार्‍या, बाहेरख्याली बापाच्या- बाप्पाजी धरसोड यांच्या तेवढ्याच फुकट गेलेल्या मुलाच्या प्रेमात पडते. एके दिवशी रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत बकुळबरोबर सायली घरच्यांंची पर्वा न करता बाहेर हुंदडते. इतक्या रात्रीपर्यंत पोर कुठे गेली असेल या काळजीनं बबनरावांच्या जीवाला घोर लागतो. पोलिसांत कंम्प्लेंट देण्यापर्यंत गोष्टी जातात. तोवर सायली घरी परतते. आपण बकुळबरोबर मौजमजा करायला गेल्याचं ती बिनदिक्कतपणे सांगते. ज्याच्या विरोधात समाजाला कलंक असल्याचा दावा करून आपण केस लढवली त्या बाप्पाजींच्या मुलासोबत आपल्या लेकीनं फिरावं हे बबनरावांना अपमानास्पद वाटतं. ते बाप्पाजींना तेवढ्या रात्री फोन लावतात आणि याबद्दल जाब विचारतात. बबनरावांनी आपल्याविरुद्ध केस करून आपली जाहीर बदनामी केली म्हणून आधीच बाप्पाजी पिसाटलेले असतात. तशात मुलावरून एवढ्या रात्री आपल्याला त्यांनी धमकावल्यामुळे तर ते आणखीनच बिथरतात. तडक बबनरावांच्या घरी येऊन ते त्यांना सज्जड दम देतात. पण नंतर त्यांच्या लक्षात येतं की, बबनरावांची पोरगीच त्यांच्या मनाविरुद्ध आपली सून करून आणल्यास त्यांचं आपसूकच नाक कापेल. म्हणून ते बकुळला सायलीशी लग्न करण्यासाठी परवानगी देतात. तेव्हा भडकून बबनराव आपला ज्युनियर सहकारी सरवटे (ज्याच्याशी आपल्या मुलीचं- सायलीचं लग्न करून द्यायचं बबनरावांच्या मनात असतं.) याला बाप्पाजींच्या आणखीन काही भानगडी असल्यास त्या शोधून काढून आणून त्यांना उघडं पाडण्याचं ठरवतात. सरवटे बाप्पाजींचं बंगलोरच्या हॉटेलातील मंदाकिनी हे प्रेमपात्र व त्यांचं प्रकरण शोधून काढतो. बबनरावांच्या हाती आता आयतंच कोलीत सापडतं. ते बाप्पाजींची बायको भामाबाई हिच्या कानावर ही गोष्ट घालतात. ती आपल्या नवर्‍याचे हे पराक्रम ऐकून घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. त्यामुळे बाप्पाजीही बबनरावांना अशाच प्रकरणात अडकवून त्यांना जगणं नकोसं करून सोडायचं ठरवतात. तेही सरवटेलाच हाताशी धरतात आणि बबनरावांची नसलेली भानगड लालीच्या रूपात उभी करतात. हे नस्तंच झेंंगट आपल्या अंगाशी आलं म्हणून बबनराव हवालदिल होतात. बाबीताईंनाही आपल्या नवर्‍याचं लग्नाअगोदरपासून लालीशी लफडं असल्याचं कळतं आणि त्याही भयंकर बिथरतात.

या सगळ्या भानगडींचं पुढं काय होतं, हे प्रत्यक्ष नाटकातच पाहणं योग्य. रत्नाकर मतकरी हे सिद्धहस्त लेखक म्हणून सर्वपरिचित आहेत. सगळ्या प्रकारच्या लेखनप्रकारांवर त्यांची हुकुमत होती. त्यामुळेच ‘एकदा पाहावं करून’सारखं धम्माल विनोदी नाटक त्यांनी लीलया लिहिलं. खरं तर हे तसं बेतलेलं नाटक. परंतु प्रेक्षकांना विचार करायला जराही उसंत न देता त्यांना नाटकातल्या गतिमान घटना-प्रसंगांत गुंतवून ठेवण्याचं कसब मतकरी यांच्या लेखणीत होतं आणि त्यांनी ते या नाटकात अतिशय हुशारीनं राबवलंय. प्रसंगनिष्ठ आणि शब्दनिष्ठ विनोदांची भरमार नाटकात आढळते. तसंच पात्रांची वृत्ती-प्रवृत्ती, स्वभाव, लकबी यांचाही नाटकात मुबलक वापर केलेला आढळतो. पुरुषी तसंच बायकी मानसिकतेची, त्यांंच्या व्यक्त होण्याबद्दलची लेखकाची समज, त्याबद्दलची त्यांची निरीक्षणंही त्यांनी विनोदाकरता यात वापरली आहेत. एकुणात फुल्ल प्रूफ असं हे नाटक आहे. फक्त त्यात कार्यकारणभाव मात्र बिलकूल शोधायचा नाही. असो.

दिग्दर्शक विजय केंकरे यांची विनोदी आणि रहस्यमयी थ्रिलर नाटकांवरील पकड इथंही चांगलीच जाणवते. एकूूण नाटकाचा बाज, त्यातील पात्रांच्या क्रिया-प्रतिक्रिया- प्रतिक्षिप्त क्रिया यांचा एकमेळ त्यांनी उत्तमपणे साधलाय. पात्रनिवडीतही त्यांनी बाजी मारलीय. वैभव मांगले, आनंद इंगळे आणि विनोदाची बर्‍यापैकी जाण असलेल्या भार्गवी चिरमुले यांच्या निवडीनं त्यांनी अर्धीअधिक लढाई आधीच जिंकलेली आहे. या सर्व पात्रांचे स्वभावविभाव, त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धती, लकबी यांचा पुरेपूर वापर त्यांनी विनोदाचे हशे वसूल करण्यासाठी केला आहे. शिवाय नाटकाची केलेली वेगवान हाताळणी नाटकाला अधिकचं परिमाण देऊन गेली आहे. धक्कातंत्राचा उपयोगही प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याकामी झाला आहे.

राजन भिसे यांनी नेपथ्यातून बबनराव आणि बाप्पाजी यांच्यातील आर्थिक-सामाजिक तसंच प्रतिष्ठेतील अंतर ठळक केलं आहे. शीतल तळपदे यांच्या प्रकाशयोजनेनं दिवसाचे विविध प्रहर आणि यातील नाट्यत्मकतेला उठाव आला आहे. अजित परब यांचं संगीतही त्यास पूरक ठरलंय. मंगल केंकरे यांनी वेशभूषेद्वारे त्या त्या पात्रांना आपापलं अस्तित्व बहाल केलं आहे. त्यांची सामाजिक पार्श्वभूमी त्यातून दृगोचर होते. संदीप नगरकर आणि प्रदीप दर्णे यांनी रंगभूषेद्वारे पात्रांना चेहरा दिला आहे.

बाप्पाजी धरसोडच्या भूमिकेत वैभव मांगले अक्षरश: रंगमंचावर बागडतात. त्यांची दक्षिणी हेलकाव्यांतील बोली, वागणं-वावरणं आणि विनोदावरचं हुकमी प्रभुत्व यांनी त्यांचे बाप्पाजी धूमाकूळ घालतात. तीच गोष्ट आनंद इंगळे यांची. बबनरावांचा घाबरटपणा, पुरुषीपणाचा वृथा आव, बाप्पाजींच्या करणीमुळे संकटात सापडल्यावर त्यांची उडणारी त्रेधातिरपीट, लाली प्रकरणात त्यांचं वाहवत जाणं, त्यातून आलेला अतिआत्मविश्वास या सगळ्या भावनिक आंदोलनांचे विविध पदर त्यांनी सूक्ष्म बारकाव्यांसह दाखविले आहेत. भार्गवी चिरमुले यांनी मद्दड, बिनडोक बाबीताई उत्तम साकारल्या आहेत. भामाबाई झालेल्या नेहा कुलकर्णी यांनी दाक्षिणात्य गृहिणीचा फणकारा, तिचा अपेक्षाभंग, नवर्‍याच्या कारनाम्यांनी हैराण होणं यथातथ्य दाखवलंय. कृष्ण चतुर्भुज यांनी प्रसन्नकुमार सरवटेंचं बिनकण्याचं व्यक्तिमत्त्व अवघ्या देहबोलीतून साकारलंय. त्यांची किडकिडीत देहयष्टीही त्याला पोषक ठरलीय. धनश्री दळवी यांनी मंदाकिनी तसंच लालीची मादकता, पुरुषांना आपल्या स्वार्थाकरता वापरून घेण्यातली मतलबी वृत्ती ठसक्यात सादर केलीय. या दोन्ही भूमिकांतलं वेगळेपणही त्यांनी छान ठसवलंय. भूषण पाटील (मल्हारराव), गौरी महाजन (सायली), अभिषेक देशमुख (बकूळ) आणि नामांतर कांबळे (श्रीयुत देखणे) यांनीही आपापली कामं चोख केली आहेत.

चार घटका मस्त विरंगुळा देणारं ‘एकदा पाहावं करून’ एकदा तरी नक्कीच पाहण्यासारखं आहे.