Eknath Khadse Bhosari Land Scam: पुणे भोसरी जमीन खरेदी घोटाळाप्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध विशेष सत्र न्यायालयाने सुरू केलेल्या आरोपनिश्चितीच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयाने मंगळवारी तात्पुरता दिलासा दिला. न्यायालयाच्या निर्णयामुळे खडसे आणि कुटंबीयांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
खडसे आणि कुटुंबीयांनी प्रकरणातून दोषमुक्त करण्याची केलेली मागणी विशेष सत्र न्यायालयाने फेटाळली होती. तसेच, खडसे यांच्यासह मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना आरोपनिश्चितीच्या प्रक्रियेसाठी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्या निर्णयाला खडसे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले व आरोपनिश्चितीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या एकलपीठापुढे मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने खडसे दाम्पत्यासह पत्नी आणि जावयाला अंतरिम दिलासा देताना पुढील सुनावणीपर्यंत आरोपनिश्चितीची प्रक्रिया सुरू करू नये, असे आदेशही दिले.
आरोपनिश्चितीसाठी खडसे दाम्पत्य विशेष न्यायालयात अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले होते. ते रद्द करण्यासाठी खडसे यांना स्वतः न्यायालयात हजर रहावे लागेल आणि ते वॉरंट रद्द करून घ्यावे लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.

