गजानन पाटील लाचप्रकरणी संबंध नसल्याचा निष्कर्ष

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना कथित सहकारी गजानन पाटील याने घेतलेल्या लाचप्रकरणी लोकायुक्तांनी ‘क्लीन चिट’ दिली आहे. पाटील याने लाच मागितल्याच्या प्रकाराशी खडसे किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा संबंध नसल्याचे स्पष्ट करीत लोकायुक्त एम एल ताहलियानी यांनी ही तक्रारच बंद करून टाकली आहे.

खडसे यांच्या भोसरी जमीन खरेदी प्रकरणातील राजीनाम्यानंतर त्यांना लोकायुक्तांनी कथित सहकाऱ्याच्या लाच प्रकरणात ‘क्लीन चिट’ दिली आहे. पाटील याच्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकायुक्तांसमोर माहिती सादर केली. पाटील आणि तक्रारदारांचे जे दूरध्वनी संभाषण ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे, त्यानुसार खडसे किंवा त्यांच्या कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे आढळून येत नाही, असे ताहलियानी यांनी म्हटले आहे.

‘उच्च न्यायालयात जनहित याचिका करणार’

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर करण्यात आलेल्या सर्व आरोपांची विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका पुढील आठवडय़ात मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया आणि भोसरी जमीन प्रकरणातील तक्रारदार हेमंत गावंडे यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

खडसे यांच्या मालमत्तांबाबत दमानिया यांनी आरोप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती व बेमुदत उपोषणही केले होते. तर भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीनखरेदीमध्ये खडसे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप गावंडे यांनी केला आहे.

भुसावळ येथे तापीपूर्णा साखर कारखाना सुरू करण्यासाठी जमिनी घेऊन तो सुरू न केल्याने जमिनी परत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे हे शेतकरी, पुण्यातील तक्रारदार गावंडे आणि दमानिया या सर्वानी एकत्रितपणे खडसे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर करण्याचे ठरविले आहे.