भूसंपादनात अडकलेली अब्बास उकानी यांची वादग्रस्त जमीन आपल्या कुटुंबियांमार्फत खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री या नात्याने उकानी यांच्या जमिनीच्या भरपाईचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यालयीन बैठक घेतली. नवीन कायद्यानुसार या जमिनीसाठी १०० कोटी रुपयांहून अधिक भरपाई मिळणे शक्य असल्यानेच खडसे यांनी उकानी यांच्यासोबत ही बैठक घेतली. स्वत:चा फायदा ज्यातून साधता येईल, असे प्रकरण पदाच्या जोरावर मार्गी लावण्याचा हा प्रयत्न नैतिकदृष्टय़ा किती उचित आहे, असा प्रश्नही यामुळे निर्माण झाला आहे.
खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी व जावई गिरीष चौधरी यांनी भोसरी येथील वादग्रस्त जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेऊन एक वारसदार हस्नैन झोएब उकानी यांच्या कोलकाता येथील ओरिएंटल बँकेच्या खात्यात ११ मार्च २०१६ रोजी ५० लाख रुपये आरटीजीएसने जमा केले. त्यानंतर खडसे यांनी मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ात अब्बास उकानी यांच्या भूसंपादनाबद्दल कार्यालयीन बैठक बोलावून एमआयडीसी व महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जमिनीचे खरेदीखत २८ एप्रिल रोजी झाले असले आणि सर्व हक्कदारांना २७ एप्रिलला पैसे दिले गेले असले तरी एका वारसदाराला आधी पैसे दिले गेल्याने जमीन खरेदीच्या निर्णयानंतर खडसे यांनी बैठक घेतल्याचे दिसून येत आहे. एमआयडीसीच्या परिपत्रकानुसार दोन वर्षांत भूसंपादनाची प्रक्रिया होणे आवश्यक आहे.
कायद्यातील तरतुदीनुसार ४० वर्षांमध्ये भूसंपादन पूर्ण होण्याची अट आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार १९६९ मध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू होऊन १९७१ मध्ये ३१(१)ची कार्यवाही पूर्ण होऊन जागा एमआयडीसीची झाली आहे.
मोबदला दिला नसल्याचे दिसून येत असल्याने १९७१ पासूनचे भाडे, भरपाईची रक्कम, त्यावरचे व्याज व अन्य सर्व बाबी गृहीत धरता ८३ लाख रुपये द्यावे लागतील.
मात्र भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचा निष्कर्ष काढून नवीन कायद्यानुसार मोबदला निश्चित केल्यास ही रक्कम १०० कोटी रुपयांहून अधिक येणार आहे. पण भूसंपादन झाले असल्याने ४० वर्षांत ते पूर्ण करण्याची अट लागू होण्याचा प्रश्नच नसल्याचे एमआयडीसीचे म्हणणे आहे.
या जमिनीवर आपला हक्क असून खडसे कुटुंबाने केलेली खरेदीच बेकायदा आहे, अशी या विभागाची भूमिका असून सातबारा उताऱ्यामध्ये ही जमीन त्यांच्या नावावर होऊ नये, यासाठी संबंधितांकडे मोर्चेबांधणी केली आहे.
एमआयडीसीची भूमिका उच्च न्यायालयात वैध ठरल्यास मंत्रिपद पणाला लागलेल्या खडसे यांच्या कुटुंबाच्या हातातून जमीन जाईलच आणि आर्थिक फटकाही सहन करावा लागेल.

उकानींचे वय काय?
अब्बास उकानी हे नव्वदीच्या घरात असून त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची वादग्रस्त जमीन खरेदी केल्याचे खडसे यांनी सांगितले होते. पण खरेदीखत करताना उकानी यांचे पॅनकार्ड जोडण्यात आले असून त्यानुसार त्यांची जन्मतारीख ६ मार्च १९४२ आहे. त्यामुळे ते सध्या ७४ वर्षांचे असून गेल्या चार वर्षांपासून त्यांनी तहसीन खान यांना कुलमुखत्यारपत्र देऊन भरपाई मिळविण्यासाठी सरकारदरबारी व उच्च न्यायालयात लढा सुरू ठेवला आहे.

आक्षेपाचे मुद्दे
* सातबाराच्या नोंदीत वडिलांनंतर केवळ अब्बास उकानी यांच्या नावाची नोंद ३ मार्च २०१० मध्ये झाली.
* अब्बास उकानी यांच्याबरोबरच अन्य ८ वारसदार असताना आणि खरेदीच्या वेळी त्यांनाही काही रक्कम दिली गेली असताना त्यांनी आपणच एकमेव वारस असल्याचा दावा सातबारा नोंदीच्या वेळी व उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत आहे.

मी काही महसूल व कायदेशीर बाबींमध्ये तज्ज्ञ नाही. माझे वकील सल्ला देतील, त्यानुसार मी न्यायालयातच बाजू मांडेन आणि न्यायालयच योग्य तो निर्णय देईल. न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असताना मी अधिक काही बोलणे योग्य होणार नाही.
एकनाथ खडसे, महसूलमंत्री