मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्या वेळी मुख्यमंत्री करणार, अशी चर्चा होती; पण स्वत:च मुख्यमंत्री झाले. त्याआधी २०१४ मध्ये भाजप आम्हाला उपमुख्यमंत्री द्यायला तयार होते; पण मला उपमुख्यमंत्री पद करावे लागू नये यासाठी ते पद शिवसेनेने घेतले नाही. शिवसेनेत सातत्याने माझे खच्चीकरण झाले. त्यामुळे अन्यायाविरोधात लढण्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार अन्यायाविरोधात उठाव केला; पण आम्ही गद्दार नाही. आम्ही कालही शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहोत आणि उद्याही शिवसैनिकच राहणार.

तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही, असा टोला नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांनी लगावला. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

राज्यसभा निवडणुकीवेळी बाहेरची तीन मते आणूनही विधान परिषदेच्या मतदान रणनीतीमधून मला वगळण्यात आले. विधान परिषद मतदानाच्या दिवशी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील याची निश्चिती करून मगच बाहेर पडलो. आमदारांना दूरध्वनी करण्यास सुरुवात केली आणि सगळे गोळा होऊ लागले.

आम्ही तिकडे असताना एकीकडे चर्चा सुरू केली, तर दुसरीकडे आमदारांच्या घरांवर-कार्यालयांवर हल्ले केले. माझ्या घरावर दगड मारण्याची हिंमत असलेला जन्माला आला नाही. माझ्यावर प्रेम करणारे इतके आहेत की, हल्ला केला तर मधमाश्यांसारखे कार्यकर्त्यांचे मोहोळ उठेल व डंख मारून धडा शिकवतील, असा इशाराही शिंदे यांनी शिवसेनेला दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूत्वाची शिकवण शिवसैनिकांना दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या काँग्रेससारख्या पक्षाबरोबर आघाडी सरकारमध्ये बसणे आमच्या आमदारांना रुचत नव्हते. ही चूक दुरुस्त करा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा भाजपसोबत युती करण्यास सांगा, असे शिवसेनेचे आमदार मला वारंवार येऊन सांगत होते. मी पाच वेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे विषय काढला; पण त्यात यश आले नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

‘फडणवीस यांनी सारे घडवून आणले’

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून यायला हवे होते. त्यासाठी मी बाहेरून तीन मतांची व्यवस्था केली होती. तरीही पराभव झाला. कारण देवेंद्र फडणवीस मोठे कलाकार निघाले. त्यांनी आमच्यासोबतच्या छोटय़ा पक्षांची-अपक्षांचीच मते भाजप उमेदवाराकडे वळवली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच राज्यात आता जे सत्तांतर झाले त्यामागेही यांचीच कलाकारी आहे. त्यांनीच सारे काही घडवून आणले. आम्ही दोघे कधी भेटायचो हे लोकांना कळायचेही नाही. लोक जेव्हा झोपलेले असायचे तेव्हा आम्ही भेटायचो व लोक उठेपर्यंत परत यायचो, असा किस्सा सांगत राज्यातील सत्तांतरामागे फडणवीस यांचीच कलाकारी असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तर महाराष्ट्राला कोणत्याही विकासकामांसाठी काहीही कमी पडू देणार नाही असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी आम्ही तुमच्यामागे पहाडासारखे उभे राहू, असा शब्द दिल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.