मुंबईतील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा ‘दसरा मेळावा’ पार पडला. यावेळी केलेल्या भाषणातून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली असून गंभीर आरोपही लावले आहे. आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर जेव्हा मी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना भेटलो, तेव्हा त्यांनी विचारपूस करण्याऐवजी आनंद दिघेंची संपत्ती कुठे-कुठे आहे? याबाबत विचारलं, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले, आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर मी पहिल्यांदा जेव्हा उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यावेळी उद्धव ठाकरे काय म्हणाले? याबद्दल मी आजपर्यंत कुणालाही बोललो नाही. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा ते दिघेसाहेबांनी ठाण्यात पक्ष कसा वाढवला? संघटना कशी वाढवली? कसे काम करत होते? आता ठाणे जिल्ह्यात आपल्याला काय करावं लागेलं? असं विचारतील असं मला वाटलं. पण त्यांनी मला काय विचारलं? तर आनंद दिघेंची संपत्ती कुठे कुठे आणि किती आहे? कुणाच्या नावावर आहे?

हेही वाचा – “…म्हणजे एकनाथ शिंदे मेले तरी चालतील” जुना प्रसंग सांगत रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

आहो, आनंद दिघे यांचं बँकेत खातंही नव्हतं. मी आजही बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, त्यांनी हे विचारल्यानंतर मला धक्काच बसला, मी कधीही खोटं बोलत नाही, खोटं बोलून सहानुभूती मिळवणारा हा एकनाथ शिंदे नाही. ज्या काळात दिघेसाहेबांची लोकप्रियता वाढत होती. त्या काळात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नाही, व्हायचं नाही, असं म्हणत होते, पण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यामुळे पक्षात जे-जे कार्यकर्ते मोठे होतात त्यांना कापा, त्यांना आडवे करा, असं काम उद्धव ठाकरेंनी केलं. पण तुम्ही त्यांचे पाय कापत असताना पक्षाचे पायही कापत होता, हे विसरून गेलात, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.