scorecardresearch

“शिंदे-फडणवीस सरकार केव्हाही पडू शकते, मध्यावधीसाठी तयार राहा”; पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या “शिंदे सरकार केव्हाही पडू शकते, मध्यावधीसाठी तयार राहा”; या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

sharad pawar Eknath Shinde
शरद पवार, एकनाथ शिंदे (संग्रहीत फोटो)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकार कधीही पडू शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, असं वक्तव्य केलं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार खूप मोठे नेते आहेत. मात्र, आपल्याला माहिती आहे की ते जे बोलतात बरोबर त्याच्या विरुद्ध होतं,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. ते सोमवारी (४ जुलै) विधानसभा अधिवेशनानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “शरद पवार खूप मोठे नेते आहेत. ते देशाचे नेते आहेत. आपल्याला माहिती आहे की ते जे भाष्य करतात बरोबर त्याच्या विरुद्ध होत असतं. त्यामुळे आमचं सरकार पूर्ण अडीच वर्ष चालेल. पुढच्या पाच वर्षांसाठी पुन्हा सत्तेत येऊ. मी जास्त पुढचं सांगत नाही, नाहीतर इतर लोक बोलतात तसं एकनाथ शिंदे बोलतात असं होईल. आमचं सरकार हे अडीच वर्ष यशस्वीपणे पूर्ण करेन. पुढील निवडणुकीत आम्ही १६५ वरून आमचे १०० व भाजपाचे १०० असे २०० आमदार निवडून येतील.”

“काल आम्ही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक जिंकली. आज सरकारवरील विश्वासदर्शक ठरावही १६४ विरुद्ध ९९ अशा मतांच्या फरकाने जिंकला आहे. चर्चा करुन अधिवेशनाची पुढची तारीख ठरवली जाईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं तसेच भाजपा-शिवसेनेच्या युतीचं सरकार स्थापन झालं आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “या सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे वाटचाल केली आहे. त्यामुळेच फडणवीस यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे लोकांच्या मनातील सरकार आहे. लोकांना अपेक्षित असलेलं हे सरकार आहे.”

“मतदारसंघातील विकासांना प्राधान्य देण्यासाठी निवडून यायचं असतं. देवेंद्र फडणवीस यांनी चोवीस तास काम केलं आहे. जी कामं रखडलेली आहेत, ते पूर्णत्वास घेऊन जाण्याचं काम फडणवीस यांच्या काळात झालं. मेट्रोच्या माध्यमातून आरामदायी प्रवास होणार आहे. हे काम काही कारणास्तव रखडले होते. हे काम पुढे घेऊन जाण्याचा फडणवीस आणि मी प्रयत्न करणार आहोत,” असंही शिंदेंनी नमूद केलं.

शरद पवार काय म्हणाले होते?

शरद पवार यांनी दोन मुख्य कारणांमुळे शिंदे सरकार कोसळेल असं मत व्यक्त केलं आहे. यापैकी पहिल्या कारणाबद्दल बोलताना पवार यांनी शिंदे गटाच्या नाराजीबद्दल भाष्य केलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट गेला असला तरी त्यांच्यात सर्व आलबेल नाही. अंतर्गत नाराजी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद मिळेल; पण अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी वाढेल. त्यातून एकनाथ शिंदे यांचे सरकार कधीही कोसळू शकते,” असे भाकीत शरद पवार यांनी वर्तवले आहे.

तर दुसऱ्या कारणाबद्दल बोलताना पवार यांनी भाजपाच्या गटामध्येही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद न मिळता उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने नाराजी असल्याचं म्हटलं आहे. “भाजपचा मुख्यमंत्री न झाल्याने भाजपच्या आमदारांनाही शिंदे-फडणवीस सरकार हे आपले वाटत नाही. त्याचा परिणाम या सरकारच्या स्थैर्यावर होणार आहे,” असेही पवार यांनी विशद केले. “ही सर्व राजकीय परिस्थिती पाहता शिंदे सरकार कोसळल्यानंतर विधानसभेची निवडणूक होऊ शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा,” असा संदेश शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde answer claim of sharad pawar that this government will collapse pbs

ताज्या बातम्या